मुंबई हल्ल्याचे कारस्थान उघड होण्याची आशा
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेला लष्कर-ए-तोयबाचा पाकिस्तानी वंशाचा अमेरिकी अतिरेकी डेव्हिड हेडली याला या प्रकरणात माफीचा साक्षीदार बनवण्यात आल्यानंतर तो सोमवारी प्रथमच मुंबईच्या न्यायालयासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष देणार आहे. या साक्षीमुळे या भीषण दहशतवादी कटामागील कारस्थानाची आणखी उकल होण्याची शक्यता आहे.
मुंबईचे न्यायालय सध्या या हल्ल्याचा कट रचणारा प्रमुख आरोपी सईद झैबुद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल याच्याविरुद्ध सुनावणी करत आहे.
एखाद्या विदेशी दहशतवाद्याने भारतातील न्यायालयात साक्ष देण्याची देशाच्या कायद्याच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ असल्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. २६ नोव्हेंबर २००८च्या मुंबई हल्ल्यातील अनेक बाबी उलगडण्यासाठी हेडलीची साक्ष महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.
सोमवार व मंगळवारी सकाळी ७ ते दुपारी १२.३० या वेळेत हेडली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याची साक्ष नोंदवणार आहे.
दरम्यान, १६६ लोक बळी गेलेल्या या हल्ल्यामागील गुन्हेगारी स्वरूपाचा कट, तसेच या हल्ल्यात कुणाकुणाचा सहभाग होता याबाबत हेडली सखोल माहिती देऊ शकतो, तसेच या प्रकरणात पाकिस्तानचा सहभागही तो उघड करू शकतो, असे मुंबईच्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.