दाऊद इब्राहीम फोन प्रकरण काही केल्या महसुलमंत्री एकनाथ खडसे यांचा पिच्छा सोडत नसल्याचे चित्र आहे. सायबर हॅकर मनीष भंगाळे यांनी खडसे यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली असून, खडसे यांना आलेल्या फोन कॉल्स डिटेल्सची सीबीआयमार्फत चौकशी करावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे खडसे-दाऊद फोन प्रकरणाला आज पुन्हा एकदा नवे वळण मिळाले.
सबळ इलेक्‍ट्रॉनिक पुरावे असतानाही मुंबई पोलिसांनी खडसेंविरूद्ध कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप मनीष भंगाळे याने केला आहे. मनीषने १८ मे रोजी दाऊदच्या कराचीतील घराच्या दूरध्वनीचे कॉल डिटेल्स मुंबई पोलिसांना दिले आहेत. “मी दिलेल्या माहितीतून समोर दिसून येत असलेल्या गुन्ह्याबद्दल कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. उलट काही लोक माझ्याकडील इलेक्‍ट्रॉनिक पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्याचा तसेच माझे ई-मेल्स डिलीट करण्याचा प्रयत्न करत आहेत‘, असे मनीषने म्हटले आहे.
दरम्यान, मुंबई पोलीस गुन्हे अन्वेशन शाखेने खडसे यांना क्लिन चिट देत सप्टेबर २०१५ ते एप्रिल २०१६ या कालावधीत ९४२३०७३६६७ या क्रमांकावर कोणताही फोन कॉल आला नसल्याचे म्हटले आहे. तसेच, या फोन क्रमांकावरू कोणता कॉलही करण्यात आला नसल्याचे मुंबई पोलीस दलातील सहआयुक्त अतुलचंद्र कुलकर्णी यांनी आगोदरच स्पष्ट केले आहे.