भारताचा मोस्ट वाँटेड डॉन दाऊद इब्राहिम देशात असल्याचे पाकिस्तानने नेहमी नाकारले आहे. परंतु, त्यांचा खोटेपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. सध्या खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेला दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरनेच दाऊद हा पाकिस्तानात असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. ठाणे पोलिसांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. विशेष म्हणजे दाऊदची पाकिस्तानात चार घरे असल्याची माहितीही दिल्याचे इक्बालने पोलिसांना सांगितल्याचे ‘एबीपी माझा’ने म्हटले आहे.

ठाण्याचे पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा) अभिषेक त्रिमुखे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. पाकिस्तान नेहमी दाऊद तिथे नसल्याचे म्हणत आला आहे. भारत सरकारने यापूर्वी पाकिस्तानला दिलेल्या दस्ताऐवजात दाऊदच्या पाकिस्तानातील घरांचे पत्ते दिलेले आहेत. दाऊद इब्राहिम हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे.

पाकिस्तानातील कराचीमध्ये दाऊद इब्राहिमची चार घरे आहेत. त्याचबरोबर दाऊदशी शेवटचा संपर्क कधी झाला हेही त्याने गुप्तचर यंत्रणांना सांगितले, असे ‘एबीपी माझा’ने म्हटले आहे.

दरम्यान, ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी वसूल केल्याप्रकरणी इक्बाल कासकरला अटक करण्यात आले होते. तो गेल्या काही वर्षांपासून ठाणे, नवी मुंबई तसेच मुंबई शहरातील बिल्डर व सराफांकडून खंडणी वसूल करत असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली होती.

तसेच ठाण्यातील खंडणीचे रॅकेट चालविण्यासाठी त्याला शहरातील एक बिल्डर, दोन नगरसेवक आणि काही राजकीय नेते मदत करत असल्याची माहितीही दिल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. हा बिल्डर, नगरसेवक आणि राजकीय नेते कोण, याविषयी आता शहरात चर्चा सुरू झाली आहे.