दाऊदला संपविल्याशिवाय मी मुंबई पोलिसांच्या स्वाधीन होणार नाही, अशी मुलाखत १८ वर्षांपूर्वी (१९९६) एका इंग्रजी मासिकाला देणारा राजन सदाशिव निकाळजे ऊर्फ छोटा राजन हा गेल्या अनेक महिन्यांपासून आजारी असून अधूनमधून त्याची तब्येत गंभीर होते, असे मुद्दामहून पसरविण्यात आले असल्याचे गुन्हे अन्वेषण विभागातील काही वरिष्ठ सूत्रांचे म्हणणे आहे.
छोटा राजनची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाली असून तो डायलिसिसवर आहे. अतिउच्च रक्तदाब आणि मधुमेहसुद्धा त्याला अनेक वर्षांपासून आहे, असे सांगितले जात असले तरी त्यात अजिबात तथ्य नाही, असे एका ‘चकमक’फेम पोलीस अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. २००० मध्ये बँकॉकमध्ये दाऊदच्या गुंडांकडून झालेल्या खुनी हल्ल्यातून बचावलेला राजन प्रामुख्याने कंबोडिया येथे बराच काळ आश्रयाला होता. मलेशियाजवळच्या समुद्रातही तो राहायचा. काही काळ तो बँकॉकमध्येही होता. त्याच्या प्रत्येक हालचालीची माहिती गुप्तचर यंत्रणेकडे होती, परंतु विविध गंभीर गुन्ह्य़ांप्रकरणी हवा असलेला छोटा राजन भारताकडे सुपूर्द करावा, अशी इच्छाच गुप्तचर यंत्रणांची नव्हती. दाऊदच्या हालचालींविषयी इत्थंभूत माहिती देणारा हा प्रमुख स्रोत असल्याचे कारण त्यामागे होते.
बँकॉकमधील खुनी हल्ल्यानंतर थायलंड पोलिसांना भरमसाट लाच देऊन तो फरारी झाल्याचा दावा त्या वेळी केला गेला असला तरी भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या सहकार्यामुळेच त्याला तेथून निसटता आले होते. दाऊदच्या गुडांची इत्थंभूत माहिती देणाऱ्या छोटा राजनचा गुप्तचर यंत्रणेने पुरेपूर उपयोग करून घेतला. आता स्वत: छोटा राजन याला येनकेनप्रकारेण प्रकाशझोतात यायचे असल्यामुळे ही माहिती पसरविण्यात आल्याचीही चर्चा आहे.  भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि छोटा राजन याच्यातील संबंधांची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा आहे. छोटा राजनचा विश्वासू साथीदार विकी मल्होत्रा याच्याबाबत मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाला टीप मिळाली तेव्हा त्यांनी रचलेल्या सापळ्यात गुप्तचर विभागाचे एक माजी संचालकही सापडले होते. संबंधित माजी संचालकाला त्या वेळी सोडून देण्यात आले होते. मात्र विकीच्या जबानीतून अनेक बाबी बाहेर आल्या होत्या.