वरळीच्या नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडियामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावेळी क्लबच्या सदस्यांना पोलिसांनी केलेल्या धक्काबुक्की प्रकरणाचा चौकशी अहवाल शुक्रवारी सादर करण्यात आला. या प्रकरणी वाहतूक पोलीस उपायुक्त केशव पाटील यांची मुख्यालय दोन येथे बदली करण्यात आली आहे.
रविवार, १ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वरळीच्या नॅशनल स्पोर्टस् क्लबमध्ये कार्यक्रम होता.  प्रोटोकॉलमुळे या भागातली वाहतूक रोखून ठेवण्यात आली होती. क्लबच्या सदस्यांना पोलिसांनी क्लबमध्ये जाण्यापासून मज्जाव केला होता. या वेळी पोलीस आणि सदस्यांमध्ये झटापट झाली होती. मुख्यमंत्र्यांनी दिलगिरी व्यक्त करून चौकशीचे आदेश दिले होते.