महाराष्ट्रात भाजपने युती तोडल्यामुळे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी भूमिका शिवसेनेने घेतली असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी अचानकपणे त्यापासून घूमजाव केले. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडणे एवढे सहज नसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चेनंतरच निर्णय घेतला जाईल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले. विधानसभा निवडणुकीनंतरचे राजकीय चित्र पाहून, भाजपची साथ पुन्हा लागणार का, हे निश्चित झाल्यानंतरच एनडीएत राहण्याबाबत शिवसेना निर्णय घेण्याची शक्यता आहे.
युती तुटल्यावर स्वाभिमान जपण्यासाठी गीते यांनी राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडावे, यासाठी शिवसेनेवर दबाव होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर उद्धव यांनी सोमवारी गीते यांच्या राजीनाम्याबाबत वक्तव्य केले होते; परंतु एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय नंतर घेऊ, असे त्यांनी मंगळवारी सांगितले. शिवसेनेने एनडीएचा घटक पक्ष म्हणून एकत्र निवडणूक लढविली असल्याने राज्यात मिळालेले यश हे संयुक्त यश आहे. जनतेने महायुतीला कौल दिला होता. त्यामुळे एनडीएतून बाहेर पडायचे असेल, तर महाराष्ट्रातील खासदारांची पुन्हा निवडणूक घ्यावी लागेल, असे ते म्हणाले.  शिवसेनेची ही भूमिका सावध असल्याचे बोलले जात आहे. त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यास भाजपच्या मदतीनेच सरकार स्थापन करावे लागले, तर एनडीएतून बाहेर पडून किंवा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भाजपला दुखाविण्याची आवश्यकता नसल्याचा मतप्रवाह शिवसेनेत आहे. त्यामुळे ठाकरे यांनी घूमजाव केले असून मोदी यांच्याशी चर्चेनंतर अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.