गोविंदराव तळवलकर यांची खंत
सध्याचे जीवन हे कमालीचे धूसर आणि अस्पष्ट झाले असून त्याचाच परिणाम संस्थात्मक जीवनावर झाला आहे. व्यक्ती येतात आणि जातात, मात्र संस्था परंपरा, संस्कृती टिकवून ठेवतात. कोणताही समाज व्यक्तींमुळे नव्हे, तर संस्थांमुळे टिकून राहतो. मात्र सध्याच्या वातावरणात संस्थात्मक जीवन हे अत्यंत दुर्बळ झाले असून संस्थात्मक जीवनाचा ऱ्हास हे राष्ट्रीय संकट आहे, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार व विचारवंत गोविंदराव तळवलकर यांनी सोमवारी व्यक्त केली.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे दिले जाणारे ‘यशवंतराव चव्हाण मराठी साहित्य-संस्कृती, कला-क्रीडा पारितोषिक’ गोविंदराव तळवलकर यांना प्रदान करण्यात आले. कौटुंबिक अडचणींमुळे स्वत: तळवलकर या सोहळ्यास उपस्थित नव्हते. त्यांच्या वतीने ‘मौज प्रकाशन’चे माधव भागवत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दोन लाख रुपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या ८८ वर्षीय तळवलकर यांचे मनोगत ‘व्हिडीओ कॉन्फरन्सिंग’द्वारे या कार्यक्रमात प्रसारित करण्यात आले.
‘जीवनात बदल हे अपरिहार्य असतात आणि ते होणारच. परंतु पूर्वी परिवर्तनास एक निश्चित दिशा होती, सूत्र होते. आता तसे दिसत नाही आणि त्यामुळेच आता जे काही घडत आहे ते आपले वाटत नाही. देशात आणि एकूणच जगात सध्या जे काही सुरू आहे, त्यामुळे पुढे काय होणार, हेही समजत नाही. सध्याच्या काळात आपले विचार इतरांनी वाचल्याशिवाय जगाला तरणोपायच नाही, असेच प्रत्येकाला वाटत असते, असे सांगत तळवलकर यांनी ‘फेसबुक’, ‘इंटरनेट’ची आपल्या खास शैलीत खिल्ली उडविली. प्रसारमाध्यमांतील या व अन्य साधनांमुळे डोकेदुखी वाढली असल्याचेही मार्मिक मत गोविंदरावांनी व्यक्त केले.
एका युगाचा अंत होतो, परंतु दुसऱ्या युगाचा जन्म अद्याप झाल्याचे जाणवत नाही. म्हणून अशा मधल्या अधांतरी काळातच आमच्या पिढीची येरझार सुरू झाली, असेही तळवलकर यांनी नमूद केले. यशवंतराव हे आपले साहित्यप्रेमी मित्र होते आणि म्हणून त्यांच्या नावाचे पारितोषिक स्वीकारताना आपल्याला विशेष आनंद होत असल्याची हृद्य भावना गोविंदरावांनी व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार ह. रा. महाजनी हे ‘लोकसत्ता’चे संपादक झाले होते, त्यानंतर मी आणि विद्याधर गोखले ‘लोकसत्ता’मध्ये आलो. त्या काळात आम्हा दोघांवर ‘लोकसत्ता’च्या संपादकीय पानाची जबाबदारी होती, अशी आठवणही तळवलकर यांनी या वेळी सांगितली.
उत्तम ग्रंथांचे दोन ‘धनी’
यशवंतराव चव्हाण आणि तळवलकर यांच्यातील साम्य सांगताना केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार म्हणाले की, या दोघांचेही वाचन उत्तम. नवीन ग्रंथांविषयी दोघांमध्ये चर्चा होत असे. या दोघांच्याही घरी उत्तम ग्रंथाचे ‘धन’ होते. तळवलकर यांना एखादी गोष्ट पटली तर ते काहीही हातचे न राखता त्याची मुक्तकंठाने प्रशंसा करीत असत. मात्र जर एखादी गोष्ट पटली नाही तर तेवढय़ाच परखडपणे आपली लेखणी चालवत. याचा अनुभव आपण स्वत: घेतल्याचेही त्यांनी कबूल केले. तळवलकर यांनी मराठीतून लिहिलेल्या ‘यशवंतराव चव्हाण : व्यक्तित्व आणि कर्तृत्व’ या ग्रंथाच्या इंग्रजी अनुवादाचे प्रकाशन या वेळी झाले.
झुबिन मेहता यांना राष्ट्रीय पुरस्कार
यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कारासाठी संगीतकार झुबिन मेहता यांची निवड करण्यात आल्याची घोषणा डॉ. काकोडकर यांनी केली. चव्हाण यांच्या जयंतीदिनी म्हणजे पुढील वर्षी १२ मार्च रोजी मेहता यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी तर सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकतार अंबरीश मिश्र यांनी केले.