रेल्वे स्थानकांवर बसून वेळ घालविल्याची माहिती

दीपाली गणोरे हत्याकांडाच्या तपासातून आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या संपूर्ण शैक्षणिक वर्षांत आरोपी सिद्धांत गणोरे (२१) फक्त एकच दिवस महाविद्यालयात हजर होता. उर्वरित दिवस त्याने रेल्वे स्थानकात बसून किंवा इतस्तत: भटकून वेळ मारून नेली. ही बाब गणोरे दाम्पत्याला माहीत नव्हती. विशेष म्हणजे वडील ज्ञानेश्वर खार पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. घरातील वातावरण त्यांना चांगलेच ठाऊक होते. पण तरीही त्यांनी एकदाही पोलीस ठाण्यापासून जवळच असलेल्या नॅशनल महाविद्यालयात जाऊन सिद्धांतबाबत चौकशी केलेली नाही, असेही समजते.

Dates of 299 exams of Mumbai University summer session announced Mumbai
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील २९९ परीक्षांच्या तारखा जाहीर; दोन लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षार्थी
कायद्याची पदवी, यूपीएससीसाठी सोडली सीएची नोकरी; जाणून घ्या IAS सोनल गोयल यांचा प्रेरणादायी प्रवास
After 78 days the results of second session of post-graduate law examination have been announced
तब्बल ७८ दिवसांनंतर पदव्युत्तर विधिच्या द्वितीय सत्र परीक्षेचा निकाल जाहीर, २४.२४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण
Junior college teachers aggressive for various demands
विविध मागण्यांसाठी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आक्रमक, १२ वीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार

परदेशात शिक्षण झालेल्या दीपाली आणि खार पोलीस ठाण्यात निरीक्षक असलेले ज्ञानेश्वर यांनी सिद्धांतला पाचवी ते दहावीपर्यंतच्या शिक्षणासाठी वसतिगृहात ठेवले होते. वसतिगृहात राहून सिद्धांतने दहावीत ९० टक्के गुण मिळवले. मात्र इंजिनीअरिंगचा अभ्यास करण्याची त्याची बिलकूल इच्छा नव्हती. त्याला रसायनशास्त्राची आवड होती. त्यामुळे त्याला बीएस्सी करायचे होते. सिद्धांतच्या इच्छेविरोधात गणोरे दाम्पत्याने इंजिनीअरिंगचा अभ्यास करण्यास भाग पाडले. आवड नसल्याने या अभ्यासक्रमात सलग तीनवेळा सिद्धांत नापास झाला. अखेर गेल्यावर्षी वांद्रे येथील नॅशनल महाविद्यालयात विज्ञान शाखेत त्याने प्रवेश घेतला.

गेल्या संपूर्ण वर्षांत सिद्धांत फक्त एकदाच महाविद्यालयात आला. दररोज तो महाविद्यालयात जाण्यासाठी म्हणून घराबाहेर पडे पण रेल्वे स्थानक किंवा इतस्तत: फिरून वेळ काढे आणि ठरलेल्या वेळेत पुन्हा घरी येई. त्याने एकही परीक्षा दिली नव्हती. याबाबत महाविद्यालयाने धाडलेल्या नोटिसाही सिद्धांतने नष्ट केल्या होत्या. हत्येपूर्वी वार्षिक परीक्षेची गुणपत्रिका दीपाली यांनी पाहण्यासाठी मागितली. त्यावरून दोघांचा वाद घडला आणि रागाच्या भरात सिद्धांतने त्यांची हत्या केली, अशी माहिती चौकशीतून समोर आली आहे. घरात सततचे वाद, आईकडून लादण्यात आलेली बंधने यातून अभ्यासातली गोडी कमी झाल्याचे सिद्धांतने सांगितले आहे. विशेष म्हणजे सिद्धांतला मित्रच नव्हते. त्याला महाविद्यालयाव्यतिरिक्त घरातून बाहेर पडण्यास बंदी होती, असेही पोलिसांना समजले आहे.