मुंबई विद्यापीठाच्या अखत्यारीतील १८६ अनुदानित महाविद्यालयांपैकी निम्म्या महाविद्यालयांना मान्यताप्राप्त प्राचार्य नाहीत, तर अनेक महाविद्यालयांमध्ये प्राचार्याच्या नियुक्तीमध्ये मनमानी व घोटाळे झाल्याचे उघडकीस आले आहे. या संदर्भात राज्यपालांकडे केलेल्या तक्रारींची चौकशी करण्याचे आदेश राज्यपाल व कुलपती विद्यासागर राव यांनी कुलगुरूंना देऊनही त्यावर ठोस कारवाई झालेली नाही. अनेक महाविद्यालयांमध्ये प्राचार्यपदासाठीचे पात्रता निकष धाब्यावर बसवून या नियुक्त्या झाल्याचा आरोप असून त्याच्या चौकशीची मागणीही राज्यपाल व शिक्षणमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठांतर्गत येणाऱ्या साडेसहाशे महाविद्यालयांपैकी निम्म्या महाविद्यालयांमध्ये पीएच.डी. तसेच मान्यताप्राप्त प्राचार्य नाहीत. त्यातच शासन ज्याच्या वेतनावर खर्च करते, अशा अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राचार्याची नियुक्ती करताना मनमानी व घोटाळा केला जात असल्याचे शिक्षकांच्या ‘मुक्ता’ संघटनेचे सचिव सुभाष आठवले व वाडा येथील कॉलेजच्या प्राचार्य डॉ. स्नेहल दोंदे यांनी राज्यपाल व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. मुलुंडमधील एका महाविद्यालयात प्राचार्याच्या नियुक्तीसंदर्भातील कागदपत्रे माहितीच्या अधिकाराखाली मागविली असता त्यात ‘एपीआय’च्या गुणांचा उल्लेखच नसल्याची तक्रार सुभाष आठवले यांनी केली आहे.
अनुदानित महाविद्यालयांमध्ये प्राचार्याची निवड करताना त्यांचे ‘शैक्षणिक कामगिरी निर्देशांक’ (एपीआय) ४०० गुणांकन असणे आवश्यक आहे. त्यानुसारच त्यांना प्राचार्यपदासाठी मुलाखतीकरिता बोलावले जाते. निवड समितीत कुलकुरूनियुक्त प्रतिनिधी, शासननियुक्त प्रतिनिधी तसेच संबंधित संस्थेचे पाच प्रतिनिधी असतात. चारशे गुणांसाठी पीएच.डी. पदवी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील, राष्ट्रीय व राज्य पातळीवरील शोधनिबंध, संशोधनात्मक कामगिरी, पुस्तक लेखन अशा अनेक बाबी विचारात घेतल्या जातात. नेमक्या याच ठिकाणी घोटाळे करून कसे तरी ४०० गुण बहाल करण्याचे उद्योग केले जातात, असे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य महादेव जगताप यांनी सांगितले.
डॉ. स्नेहल दोंदे यांनीही ‘एपीआय’मधील घोटाळ्यांवर बोट ठेवले असून कुलगुरूंकडे अनेकदा तक्रारी केल्यानंतरही न्याय मिळाला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कुलगुरू राजन वेळुकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात त्यांनी राज्यपालांकडे चार तक्रारी केल्या असून राज्यपालांनी त्या चौकशीसाठी कुलगुरूंकडेच पाठविल्यामुळे अखेर डॉ. दोंदे यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात कुलगुरू तसेच कुलगुरूनियुक्त प्रतिनिधींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार करावी लागली. आपल्याकडे एपीआयचे ८८७ गुण असल्याचे पत्रात म्हटले आहे.
‘एकमेव उमेदवार असतानाही निवड का नाही?’
एकूण १६ महाविद्यालयांमध्ये प्राचार्यपदासाठी आपण मुलाखती दिल्या असून यापैकी काही महाविद्यालयात आपण एकमेव उमेदवार असतानाही आपली निवड करण्यात आली नसल्याचे डॉ. दोंदे यांनी सांगितले. विद्यापीठाने प्राचार्याचे पॅनल तयार करून नियुक्ती केल्यास घोटाळ्याला वाव राहणार नाही, असे जगताप यांचे म्हणणे आहे. तर विद्यापीठाकडेच एपीआयच्या गुणांची माहिती नसताना प्राचार्याची नियुक्तीला कुलगुरूंची मान्यता मिळतेच कशी, असा सवाल सुभाष आठवले यांनी केला आहे. या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करून चौकशीची मागणीही आठवले यांनी केली.