एरव्ही रात्री साडेबाराची अखेरची गाडी पकडण्यासाठी गर्दी करणाऱ्या अनेक चाकरमान्यांनी शनिवारी रात्री ११च्या आतच छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाकडे धाव घेतली. ११.१८च्या अखेरच्या गाडीसाठी हळूहळू गर्दी वाढू लागली आणि गाडी गेल्यानंतर संपूर्ण स्थानक रिकामे झाले.  
मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या शनिवारी रात्रीच्या मेगाब्लॉकमुळे सीएसटी स्थानकावर हे चित्र होते. रात्री ११.१८ नंतर गाडीच नसल्याचे समजल्यावर अनेकांनी संध्याकाळीच कार्यालयातून बाहेर पडणे पसंत केले. शनिवारी फिरण्यासाठी येणाऱ्या लोकांनीही वेळेतच गाडी पकडून घरचा रस्ता धरण्याचे ठरविल्यामुळे नरिमन पॉइंट, गिरगाव चौपाटी परिसरात रात्री आठनंतरच गर्दी कमी होऊ लागली. मेगाब्लॉकमुळे शनिवारी रात्री अखेरची धीमी गाडी १०.३०ला तर १०.५० वाजता कसारा जलद गाडी सुटली. त्यानंतर कर्जतला जाणारी ११.१८ ची अखेरची जलद गाडी सुटली. त्यानंतर सीएसटी स्थानकातून मेन लाइनवरून जाणारी एकही गाडी सुटली नाही. बेस्टनेही रात्री पावणे अकरा ते सकाळी सव्वासहाच्या दरम्यान खास बेस्ट बसेसची सोय केली होती. हार्बरने प्रवास करणाऱ्यांनी पश्चिम रेल्वेतून दादपर्यंत प्रवास करून पुढे टॅक्सी व बसने घरी जाणे पसंत केले.