ठाण्यातील वातानुकूलित स्वच्छतागृहाचा उपक्रम मध्य रेल्वेच्या मते यशस्वी झाल्यानंतर आता मध्य रेल्वे कुर्ला येथेही डिलक्स स्वच्छतागृह उभारणार आहे. हे स्वच्छतागृह वातानुकूलित नसले, तरी या स्वच्छतागृहात लघुशंकेसाठी पुरुषांनाही एक रुपया शुल्क आकारले जाणार आहे. कुर्ला स्थानकाच्या पूर्वेकडे पनवेलच्या दिशेला असलेल्या तिकीट खिडकीच्या जागी हे स्वच्छतागृह आकारले जाणार आहे. हे स्वच्छतागृह एप्रिलपर्यंत तयार होणार असल्याचे मध्य रेल्वेतर्फे सांगण्यात आले.
मध्य रेल्वेवरील गजबजलेल्या स्थानकांच्या यादीत कुर्ला स्थानकाचा क्रमांक वरचा आहे. या स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या दर दिवशी चार लाखांच्या आसपास आहे.  या स्थानकावरील स्वच्छतागृहेदेखील अत्यंत गलिच्छ आहेत. आता मात्र मध्य रेल्वेने कुर्ला स्थानकातील स्वच्छतागृहांची ही ओळख बदलण्याचा निश्चय केला आहे.
 हे स्वच्छतागृह उभारताना रेल्वे नवी निविदा पद्धत वापरणार आहे. पूर्वी स्वच्छतागृहाच्या उभारणीपासून ते त्याच्या देखभालीपर्यंत सर्व कंत्राट एकाच कंत्राटदाराला दिले जात असे. मात्र या नव्या पद्धतीप्रमाणे स्वच्छतागृह उभारणीसाठी एक आणि देखभाल-दुरुस्तीसाठी दुसरे अशी दोन कंत्राटे दिली जाणार
आहेत.
 स्वच्छतागृह उभारणाऱ्या कंत्राटदाराला रेल्वे पैसे देऊन त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी दुसऱ्या कंत्राटदारावर सोपवणार आहे. स्वच्छतागृह उभारणीसाठी येणारा खर्च ते वापरणाऱ्यांकडून मिळणाऱ्या एक-एक रुपयातून वसूल करणे कठीण आहे. त्यामुळे या पद्धतीचा अवलंब केला जाणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
याबाबत मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांना विचारले असता त्यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. मध्य रेल्वे कुर्ला येथे असे स्वच्छतागृह उभारत आहे. हे स्वच्छतागृह वातानुकूलित नसले तरी अत्यंत साफ, नीटनेटके आणि स्वच्छ असेल. या स्वच्छतागृहाची स्वच्छताही दर दिवशी काही तासांनी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट
केले.
हे स्वच्छतागृह हार्बर मार्गावरील प्लॅटफॉर्म क्रमांक ९ च्या जवळील तिकीट खिडकीच्या जागी बांधण्यात येणार आहे. या तिकीट खिडकीच्या इमारतीचा ढाचाही वापरला जाणार आहे. या स्वच्छतागृहात लघुशंकेसाठी पुरुष व स्त्रियांकडून एक रुपया आकारला जाणार आहे, तर शौचालयाच्या वापरासाठी पाच रुपये घेतले जातील.