बहिष्काराच्या आवाहनानंतरही चिनी तोरणांनाच मागणी अधिक; उल्हासनगरात बनवल्या जाणाऱ्या वस्तूंवर गंडांतर

भारत-पाकिस्तानमधील संघर्षांत पाकिस्तानच्या बाजूने उभ्या ठाकलेल्या चीनला धडा शिकवण्यासाठी यंदाच्या दिवाळीत चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन करणारी मोहीम समाजमाध्यमांवर जोर धरत असली तरी, प्रत्यक्षात यंदाही घर प्रकाशमान करण्यासाठी चिनी दिव्यांच्या तोरणांनाच प्रचंड मागणी आहे. मुंबईसह अनेक शहरांना चिनी दिव्यांच्या तोरणाचा तसेच अन्य चिनी बनावटीच्या वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या उल्हासनगरात यंदाही चिनी मालालाच अधिक उठाव असल्याचे दिसून आले आहे. ‘उल्हासनगर में चिनी बल्बडीयाँ हीं चलती है’ उल्हासनगरमधील एका व्यापाऱ्याचे बोल याबाबत बरेच काही सांगून जातात. चिनी मालात अत्यंत आकर्षक वस्तूंची उपलब्धता व उल्हासनगर मध्ये तयार होणाऱ्या मालाची मागणी पूर्ण करण्यासाठी उद्भवलेल्या काही अडचणी याने चिनी मालाचे येथे फावत असल्याचे दिसते आहे.

भारत-पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण संबंधांनंतर सध्या देशात पाकविरोधी नारे जोरात घुमत आहेत. त्याचबरोबरीने पाकिस्तानला समर्थन देणाऱ्या चीनबद्दलही संताप व्यक्त होत आहे. चीनला अद्दल घडवण्यासाठी यंदा चिनी मालाची खरेदी करू नका, असे आवाहन विविध राजकीय पक्षांकडून तसेच समाजमाध्यमांतून केले जात आहे. यामुळे चिनी कंपन्यांना तोटा होईल, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, उल्हासनगर या सर्वच प्रकारच्या वस्तूंच्या निर्मितीत आघाडीवर असलेल्या शहरातील बाजारपेठा दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर चिनी वस्तूंनी भरून गेल्या आहेत. यात विशेषत: विविध प्रकारच्या दीपमाळा, कंदील, पणत्या, प्लास्टिकच्या आकर्षक वस्तू यांचा समावेश आहे. मुंबईसह देशभर विविध प्रकारच्या मालाची विक्री करणाऱ्या उल्हासनगरमध्ये दिवाळीच्या खरेदीसाठी चिनी वस्तूंचेच अतिक्रमण दिसून येत आहे.

चिनी वस्तू आकर्षक असून त्या स्वस्तातदेखील मिळतात. त्या टिकत नसल्या तरी त्यांच्या गरजेपुरत्या वापराने आमचे काम भागते. स्थानिक बनावटीच्या मालात विविधताच नसते. ते विशेष आकर्षकही नसतात. त्यामुळे दिवाळीसाठी यंदा चिनी वस्तू घेत आहोत. असे येथे आलेले एक खरेदीदार दिनेश म्हसकर यांनी सांगितले.

मालाची स्वस्ताई

तीस मीटर लांबीच्या दिपमाळा येथील बाजारपेठेत अवघ्या २५० रुपयात तर छोटय़ा माळा ८० रुपयांत मिळतात. या दीपमाळांचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. तसेच, विविध प्रकारचे कंदील येथे विक्रीला असून त्यांच्या किमतीदेखील ३०० रुपयांवर नाहीत.

उल्हासनगरमध्ये गेल्याच वर्षी जवळपास १ हजार बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. जेथील बांधकामे तोडण्यात आली तेथे इलेकट्रॉनिक वस्तूंची बाजारपेठ होती. या बाजारपेठेतील २७५ दुकाने नष्ट झाली. त्याचा परिणाम इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रेत्यांवर पडला. दिवाळीसाठी चिनवरून येणाऱ्या दिव्यांच्या माळा, कंदील, प्लास्टिकच्या आकर्षक वस्तू या अत्यंत आकर्षक व स्वस्त आहेत. त्यांच्या इतकी स्वस्ताई आणि मालातले वैविध्य येथील उत्पादक देऊ शकत नाहीत. त्यामुळे दिवाळीची आकर्षक वस्तूंची इथली बाजारपेठ चीनमधील मालाने गेल्या वर्षीपेक्षा जास्त प्रमाणात काबीज केली आहे.

– नरेश दुर्गानी, अध्यक्ष, फेडरेशन ऑफ सिंधुनगर व्यापारी असोसिएशन