दिवा प्रज्वलित करून हवेत सोडण्यात येणारे आकाशकंदील गेल्या तीन वर्षांपासून आगीच्या घटनांना कारणीभूत ठरत असून त्यांच्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करणारे पत्र अग्मिशमन दलाने पोलीस आयुक्तांना पाठविले आहे. तसेच असे कंदील आकाशात सोडणारे, विक्रेते आणि साठा करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावेत अथवा त्यांच्याविरुद्ध दंडात्मक कारवाई करावी, अशी विनंतीही या पत्रात करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षांपासून मुंबईत मकरसंक्रांत, दिवाळीच्या काळात दिवा प्रज्वलित करून हवेमध्ये आकाशकंदील सोडण्यात येतात. वाऱ्याबरोबर हेलकावे खात आकाशकंदील दूरवर जातात. काही वेळा उंच इमारत, झोपडय़ा, एचपीसीएल- बीपीसीएलसारखे मोठे कारखाने, आरे, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आदी वनांमध्ये जळते आकाशकंदील पडून मोठी दुर्घटना घडू शकते. तसेच या आकाशकंदिलाचा वापर दहशतवादी कृत्यासाठी होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवत प्रमुख अग्निशमन अधिकारी प्रभात रहांगदळे यांनी या आकाशकंदिलांवर बंदी घालण्याची मागणी पत्रात केली आहे.

अशा प्रकारचा आकाशकंदील १७ जानेवारी २०१५ रोजी मालाड पूर्व येथील कुरार व्हिलेज येथील बांधकाम सुरू असलेल्या ओमकार एल्टा मॉटे इमारतीवर पडून मोठी आग लागली होती. सातत्याने या कंदिलांमुळे होणाऱ्या दुर्घटनांमध्ये वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी त्यावर बंदी घालणे आवश्यक असल्याचे रहांगदळे यांनी पत्रात म्हटले आहे.

अमेरिका, थायलंड आदी देशांनी या आकाशकंदिलांवर बंदी घातली आहे. तसेच नॅशनल फायर प्रोटेक्शन असोसिएशनचाही त्याला पाठिंबा आहे. त्यामुळे अशा आकाशकंदिलांची विक्री करणारे विक्रेते आणि त्याचा साठा करणाऱ्यांवर बंदी करावी. अशा  सर्व व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करावेत अशी मागणी करण्यात आली आहे.

untitled-11