न्यायालयाच्या आदेशानंतर या रिकाम्या इमारतीमध्ये प्रसार माध्यमांबरोबर आपले घर वाचविण्यासाठी आदर्शचे सचिव आणि सभासद जमा झाले होते. २०१०नंतर सुरक्षारक्षक सोडून तेथे कोणीही फिरकत नाही. अर्धवट बांधकाम थांबविण्यात आल्यामुळे तळमजल्यावर वाळूचे ढीग रचलेले दिसतात. बेरंगी भिंती, जाळेजळमटे आणि उखडलेल्या विटा, वाळूंचे डोंगर यांचेच वास्तव्य असलेल्या ३१ माळ्यांची ‘आदर्श’ इमारत. सोसायटीला लोखंडाच्या पत्र्यांच्या आडोशाने फाटक तयार करण्यात आले आहे तर वीज नसल्याने सोसायटीच्या कार्यालयात जनरेटरच्या साहाय्याने दिवे लावण्यात आले आहेत. गेली अनेक वर्षे आदर्श सोसायटी अशाच सुन्न वातावरणात उभी आहे.
शुक्रवारी न्यायालयाच्या निर्णयानंतर प्रसार माध्यमांच्या गर्दीने आणि कॅमेऱ्याच्या किलकिलाटाने इमारतीमध्ये काहीशी चलबिचल झाली. सोसायटीचे सचिव आणि सहकार्यानी प्रसार माध्यमांना हाकलून लावले. तर आदर्शच्या डाव्या बाजूला बस स्टॅण्डच्या समोरील बाजूला टॅक्सी थांब्यावर उभ्या असलेल्या टॅक्सीचालकांनी इमारत पाडणार असल्याचे कळताच आनंद व्यक्त केला. इमारत पडल्यानंतर रस्त्यावर गाडी पार्क करण्यापेक्षा येथेच टॅक्सी पार्क करता येईल या कल्पनेने ते सुखावले. तर चौकात उभ्या असणाऱ्या कित्येकांनी राजकीय मंत्र्यावर आरोप करीत आदर्शच्या मागील झोपडपट्टी पुनर्वसनाचा मार्ग मोकळा झाल्याची भावना व्यक्त केली.

इमारत पाडली जाईल तेव्हा खरे मानू : उद्धव
मुंबई : आदर्श इमारत पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत, पण थोरामोठय़ांच्या सदनिका असलेली इमारत पाडली जाईल तेव्हा खरे मानू, आदर्श स्वतहून पडण्याआधी ती पाडलीच पाहिजे, अशी ठाम भूमिका शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी मांडली. महाराष्ट्र दिनी काळा दिन साजरा करण्याचे आवाहन करणाऱ्या श्रीहरी अणे यांना लक्ष्य करत आंदोलनाची भाषा करणाऱ्या व्यक्ती, ज्या आईच्या कुशीतून जन्माला आले, त्या कुशीवर वार करणाऱ्या दळभद्री औलाद असल्याची जळजळीत टीका त्यांनी केली. उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदर्श इमारत पाडण्याच्या आणि महाराष्ट्र दिनाबाबत श्रीहरी अणे यांनी आंदोलनाच्या दिलेल्या हाकेवर भाष्य केले. थोरामोठय़ांच्या सदनिका असलेली ही बेकायदा इमारत पडण्याआधी पाडलीच पाहिजे, असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी रविवार १ मे रोजी साजरा होणारा महाराष्ट्र दिन विदर्भवादी नेत्यांनी काळा दिवस म्हणून साजरा करत काळे झेंडे फडकवावेत असे आवाहन केले आहे. याचा समाचार घेत महाराष्ट्र दिनी अशाप्रकारे आंदोलनाची भाषा करणे दुर्दैवी असल्याचे म्हटले.

पाच वर्षांनंतर याचिकेवर निकाल
पर्यावरण संरक्षण कायदा आणि नियम धाब्यावर बसवून उभी राहिलेली ‘आदर्श’ पाडण्याचे आदेश १६ जानेवारी २०११ रोजी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिले होते. त्यानंतर लगेचच सोसायटीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तेव्हापासून सप्टेंबर २०१६ पर्यंत याचिकेवर तांत्रिक कारणास्तव सुनावणीच होत नव्हती. कधी सोसायटीच्या वतीने, तर कधी प्रतिवाद्यांच्या वतीने उभ्या राहिलेल्या वकिलांच्या ‘फर्म’सोबत काम केल्याने काही न्यायमूर्तीनी प्रकरणाची सुनावणी घेण्यास नकार दिला, तर काहींनी कधी तरी आरोपींचे अन्य प्रकरणात वकीलपत्र घेतले होते म्हणून प्रकरणापासून दूर राहणे पसंत केले होते. अखेर सोसायटीच्या वतीने मुख्य न्यायमूर्तीना याचिका पाच वर्षे प्रलंबित असल्याचे आणि त्याच्या सुनावणीसाठी विशेष खंडपीठ स्थापन करण्याची विनंती करण्यात आली. याचिकेवरील सुनावणीसाठी न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठाची नियुक्ती केली.
मालकी हक्काचा मुद्दा अद्यापही अनुत्तरित
ज्या जागेवर ‘आदर्श’ उभी राहिलेली आहे ती जागा कारगिल युद्धातील शहिदांचे कुटुंबीय तसेच जखमींसाठी आरक्षित करण्यात आली होती. मात्र सोसायटीने मंत्री, नोकरशहा आणि संरक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन ती बळावली, असा आरोप करत संरक्षण मंत्रालय त्यावर आपला मालकी हक्क सांगत आहे, तर ही जागा कधीच शहिदांचे कुटुंबीय वा जखमींसाठी आरक्षित नव्हती, असा दावा करत राज्य सरकार त्यावर आपला दावा सांगत आहे.

* ९ जुलै १९९९- सरकारकडून ‘आदर्श’ सोसायटीला भूखंड देण्याचा निर्णय घेण्यात आला.
* ४ ऑक्टोबर २००४- मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सोसायटीला भूखंडाचे हस्तांतरण केले.
* १६ सप्टेंबर २०१०- ‘आदर्श’ सोसायटीला मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) कडून ताबा प्रमाणपत्र मिळाले.
* २५ ऑक्टोबर २०१०- नौदलाने सुरक्षेच्या कारणास्तव ‘आदर्श’ सोसायटीला आक्षेप घेतला
* २८ ऑक्टोबर २०१०- राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नातेवाईकांच्या नावे ‘आदर्श’मध्ये सदनिका असल्याचे प्रसारमाध्यमांतून उघड झाले.
* ३ नोव्हेंबर २०१०- एमएमआरडीएने ‘आदर्श’ सोसायटीचे ताबा प्रमाणपत्र रद्द केले.
* ९ नोव्हेंबर २०१०- ‘आदर्श’प्रकरणी अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
* २९ जानेवारी २०११- सीबीआयने ‘आदर्श’ घोटाळाप्रकरणी १४ जणांवर गुन्हे दाखल केले. यात अशोक चव्हाण, कन्हैयालाल गिडवाणी यांच्यासह अन्य उच्चपदस्थांचा समावेश.

आदर्शमधील सभासद
आर.सी. ठाकूर, मदन मोहन वांचू, कमांडर राजीव पायलो, कॅप्टन एस.एस. बाळकृष्णन, ले. कर्नल पी.एस. तंपी, परमानंद के. हिंदुजा, सुधाकर लक्ष्मण मडके, सुशिला शालिग्राम, अ‍ॅडमिरल माधवेंद्र सिंह, जे.एम. अभ्यंकर, पी.व्ही. देशमुख, गजानन सदाशिव कोळी, सिद्धार्थ सोनू गमरे, अमोल विठोबा, किरण भडांगे, गिरीश प्रवीणचंद्र मेहता, कन्हैयालाल विशनदास गिडवाणी, कैलास कन्हैयालाल गिडवाणी, अमित के. गिडवाणी, अरुण पांडुरंग पवार, कॅप्टन आशीष टंडन, ले.ए. पुरणकुमार, मेजर जनरल विरेंद्रसिंह यादव, मेजर जनरल पीतांबर किशोर रामपाल, कर्नल अमरजित सिंह, ले. कर्नल पी.एच. राम, ब्रिगेडियर अविनाश चंद्रचोप्रा, मेजर आर.के. सिंह, ले. कर्नल जॉन मॅथ्यू, मेजर जनरल तेज क्रिशन कौल, ले. जनरल गुरुबक्षसिंह सिहोटा, मेजर एम.डी. सिंह, कॅप्टन गोपाल भारती, रोमेशचंद्र शर्मा, ले. जनरल शंतनो चौधरी, व्हाइस अ‍ॅडमिरल मदनजित सिंह, कर्नल ताराकांत सिंह, कॅप्टन ए.पी. सिंघ, एल.के. चुनीलाल, राजेश शांतीलाल बोरा, अरुण व्ही. डवले, संपत आर. खिडसे , आनंद एस. भरोसे, सीमा व्यास , कनिष्क जयराज फाटक, सुप्रिया व्ही. मस्के, श्रीनिवास दादासाहेब पाटील, श्रीपत भीमराव चव्हाणे, शिवाजीराव सी. देशमुख, शहा धवल राजेश, कविता शाम गोडबोले, हरभजन सिंह, मालव जयंत शाह, राजेशकुमार दास, आदित्य भगत पाटील, सुमिला सेठी, चंद्रशेखर रामराव गायकवाड, शिवाजी शंकर काळे, कृष्णराव धोडिंबा भेगडे, संजय राडकर, अरुण सोपान अदाते, जितेंद्र सतीश आव्हाड, सोनिया सुरेश कोल्हापुरे, विश्वास बापू चौगले, रघुनाथ मारुती भोसले, सुरेश प्रभाकर प्रभू, उत्तम रामकृष्ण गखरे, मेजर एन.डब्ल्यू. खानखोजे, निवृत्ती गणपती भोसले, अमरसिंह वाघमारे, कृष्णाजीराव रखमाजीराव देसाई, ओंकार तिवारी, रणजित संगीतराव, बाळासाहेब सावंत, देवयानी खोब्रागडे, धोंडिराम वाघमारे, ले. कमांडर गुरुमुखसिंह, सीमा विनोद शर्मा, जगदीश अंबिकाप्रसाद शर्मा, साजनसिंग यादव, केदारी विशाल किशोर, जनरल दीपक कपूर, जनरल निर्मल चंदर विज, साधुसिंग फुलसिंग राजपूत, मुकुंदराव गोविंदराव मानकर, संजॉय शंकरन, आय.ए. कुंदन, परमवीर अभय संचेती, सुरेश गुलाबराव अत्राम, शीतल विनोद गंजू, अनिल कुमार ठाकूर, भावेश अंबालाल पटेल, भगवती मनोहरलाल शर्मा, मदनलाल शर्मा, सत्यसंधा विनायक बर्वे, मेजर जनरल राम हुडा, रुपाली हरिश्चंद्र रावराणे, मणिलाल के. ठाकूर , सुशील चंद्र शर्मा, कर्नल के.जे.एस. खुराणा, डॉ. अर्चना तिवारी, कॅप्टन प्रवीण कुमार