मुंबईतील मलबार हिलमधील जिना हाऊस तोडून त्या ठिकाणी सांस्कृतिक केंद्र उभारण्याची मागणी भाजप आमदार मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. जिना हाऊसमध्येच फाळणीचा कट आखला गेला असून ही वास्तू पाडलीच पाहिजे असे लोढा म्हणालेत.

संपत्ती सोडून पाकिस्तान व चीनमध्ये गेलेल्या लोकांना त्यावर दावा सांगता येणार नाही, अशी तरतूद असलेले शत्रू संपत्ती विधेयक राज्यसभेत नुकतेच मंजूर झाले होते. शत्रू संपत्तीला वारसा कायदा लागू होणार नाही व त्याचे हस्तांतरण ताबेदाराकडून शत्रूकडे किंवा संबंधितांकडे होणार नाही अशी तरतूद या कायद्यात आहे. या कायद्यानुसार मुंबईतील जिना हाऊसची मालकी भारत सरकारकडे आली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार मंगलप्रभात लोढा यांनी जिना हाऊस पाडण्याची मागणी केली आहे. जिना हाऊस हे फाळणीचे प्रतिक आहे. याच घरातून फाळणीचा कट आखला गेला. त्यामुळे ते घर पाडण्याशिवाय पर्याय नाही असे त्यांनी म्हटले आहे. मंगलप्रभात लोढा यांनी यासंदर्भात केंद्र सरकारलाही पत्र पाठवले आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाला या घराची देखभाल करावी लागते आणि यासाठी लाखो रुपये खर्च झालेत असे लोढा यांनी निदर्शनास आणून दिले. शत्रू संपत्ती विधेयक मंजूर झाल्याने आता जिना यांच्या कुटुंबीयांना या घरावर दावा करता येणार नाही. त्यामुळे हे घर पाडून महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा दिसेल अशी वास्तू बांधण्याची मागणी त्यांनी केली. या वास्तूमध्ये राज्यासह देशाचा गौरवशाली इतिहासही दिसला पाहिजे असे त्यांनी नमूद केले.

पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जीना यांचा मुंबईतील मलबार हिल परिसरात अडीच एकरच्या जागेवर भव्य बंगला होता. १९३६ मध्ये जिना कायद्याचे शिक्षण घेऊन इंग्लंडवरुन भारतात परतले तेव्हा त्यांनी हा बंगला बांधला होता. या बंगल्यातूनच त्यांनी मुस्लीम लीगचा कार्यभारही सांभाळला. पाकिस्तानच्या दृष्टीने जिना हाऊस हा महत्त्वाचा विषय आहे. या जागेवर पाकिस्तानचे दुतावास सुरु करण्याची परवानगी द्यावी अशी पाकची प्रलंबित मागणी आहे.