27 May 2016

ठाण्यातील अनधिकृत पक्ष कार्यालयांवर अखेर हातोडा

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शनिवारी सकाळपासूनच ठाणे परिसरातील विविध राजकीय पक्षांच्या अनधिकृत जनसंपर्क कार्यालयांवर

खास प्रतिनिधी, ठाणे | February 17, 2013 5:07 AM

उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार शनिवारी सकाळपासूनच ठाणे परिसरातील विविध राजकीय पक्षांच्या अनधिकृत जनसंपर्क कार्यालयांवर महापालिका प्रशासनाने कारवाई सुरू केली.  
सकाळी पावणेसात वाजता पोलीस बंदोबस्तात सुरू झालेल्या या कारवाईत एकूण नऊ कार्यालये जमीनदोस्त करण्यात आली. काही राजकीय पक्षांनी स्वत:हून कार्यालय तोडून या कारवाईस सहकार्य केले. मुंब्रा येथील समाजवादी पक्षाचे जनसंपर्क कार्यालय तोडण्यात आले, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यालय कार्यकर्त्यांनी स्वत:हून हलविले. माजी आमदार सुभाष भोईर यांच्या कार्यालयाचे वाढीव बांधकामही यावेळी तोडण्यात आले. याच परिसरातील काँग्रेस कार्यालयावरही कारवाई करण्यात आली.   
कळवा येथील भाजपच्या तर विटावा येथील शिवसेनेचे कार्यालय तोडण्यात आले. वर्तकनगर-भीमनगर येथील रिपाइंचे कार्यालय कार्यकर्त्यांनी स्वत:हून हटविले. मानपाडा प्रभाग समितीच्या अखत्यारीत असणाऱ्या डोंगरीपाडा आणि मनोरमानगर येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनीही आपापली कार्यालये स्वत:हून तोडली. ठाणे महापालिका क्षेत्रात विविध राजकीय पक्षांची एकूण १६७ अनधिकृत कार्यालये असून त्यापैकी २२ कार्यालये ४८ तासात हटविण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

First Published on February 17, 2013 5:07 am

Web Title: demolition of illegal political party offices in thane