दोन आठवडय़ात ३७०२ तापाच्या रुग्णांची नोंद; तिघांचा बळी

ऊनपावसाच्या खेळाने मुंबईची हवा बाधक होऊ लागली असून अशा वातावरणात डेंग्युसदृश्य तापाची लक्षणे दिसून येत आहेत. गेल्या दोन आठवडय़ांमध्ये मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांत विविध पावसाळी आजारांच्या एकूण ३७०२ रुग्णांची नोंद झाली आहे. तर पावसाळ्यात बळावणाऱ्या या आजारांमुळे गेल्या १५ दिवसात ३ जणांचा बळी गेला आहे. यात धारावीतील ६२ वर्षांची महिला, मरोळ येथील ३० वर्षांच्या पुरुष आणि चेंबूरमधील ३२ वर्षांच्या पुरुषाचा समावेश आहे.

पावसाळ्यामध्ये दूषित अन्न आणि पाण्यामुळे आजांराचा प्रादुर्भाव होत असतो. मात्र यावेळी डेंग्यु सदृश्य तापाची लक्षणे दिसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बराच काळ राहणारा ताप, अंग आणि पोटदुखी, नाक आणि हिरडय़ातून रक्त येणे अशी अनेक कारणे डेंग्युमध्ये दिसून येतात. हीच लक्षणे डेंग्यु सदृश्य आजारामध्ये दिसत असले तरी वैद्यकीय चाचणीमध्ये डेंग्यु असल्याचे निदान न झाल्यामुळे रुग्णांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे असे राज्यस्तरीय पॅथलॅब संघटनेचे अध्यक्ष संदीप यादव यांनी सांगितले.

अनेकदा रुग्ण स्थानिक डॉक्टरांनंतर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येतात. आजाराची लक्षणे दिसत असतानाचा महत्त्वाचा काळात योग्य उपचार न केल्यामुळे आजार बळावतो. उशिरा दाखल झाल्यामुळे या रुग्णांवर उपचार करणे अवघड होते, असे नायर रुग्णालयातील डॉ.भदाडे यांनी सांगितले. काही दिवसांच्या मुसळधार पावसाच्या आगमनानंतर गेल्या आठवडय़ात मुंबईत पावसाने मारलेली दडी अशा बदलत्या वातावरणाचा परिणामही नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. सध्या तापाबरोबर पोटाचे आजार बळावत असून याला बाहेरील उघडय़ावरील आणि अस्वच्छ अन्नपदार्थ जबाबदार आहे. त्यामुळे बाहेरील अन्नपदार्थ टाळावेत असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला आहे.

घ्यावयाची काळजी

  • रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे हे आजार बळावण्याचे प्रमुख कारण असल्याने आहारात प्रोटीयुक्त पदार्थाचा समावेश करावा. यात अंडी, मोड आलेली कडधान्ये, दूध यांसारख्या पदार्थाचा समावेश असावा.
  • खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल ठेवावे.
  • जेवायला बसण्यापूर्वी किंवा काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्यावेत. वैयक्तिक स्वच्छतेबरोबर आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा आणि पाणी उकळून प्यावे.

dengu-chart