दिवसाला ८ ते १० रुग्णांची भरती; खाटा वाढवण्यास परवानगी

पावसाने माघार घेऊन जवळपास १५ दिवस लोटत आले तरी मुंबईतून डेंग्यू हटण्याचे नाव घेताना दिसत नाही. ऑक्टोबर महिना संपत आला तरी डेंग्यूग्रस्तांची संख्या कमी झाली नसून सरकारी-पालिका रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांमध्येही रुग्णांची रीघ लागली आहे. काही ठिकाणी तर खासगी नर्सिग होममध्ये खाटा वाढवून रुग्णांवर उपचार केले जात आहेत. सरकारी वा पालिका रुग्णालयांमध्ये सर्व रुग्णांना सामावून घेणे शक्य नसल्याने पालिकेने खासगी रुग्णालयांना ५ टक्के खाटा वाढवून अधिकाधिक रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी दिली आहे.

पावसाळा सुरू झाल्यानंतर जुलै महिन्यापासून सुरू झालेले डेंग्यूचे थैमान ऑक्टोबर संपत आला तरी सुरू आहे. इतकेच नव्हे तर नोव्हेंबपर्यंत डेंग्यूचा प्रभाव राहील, असे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. सध्या साथीच्या आजारांमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांमध्ये ८० टक्के रुग्ण डेंग्यूचेच असतात. दिवसाला सुमारे ८ ते ९ डेंग्यूचे रुग्ण दाखल होत असल्याचे घाटकोपर येथील ‘न्यूलाइफ’ नर्सिग होमचे डॉ. दीपक बेड यांनी सांगितले. त्यामुळे खासगी रुग्णालये तसेच नर्सिग होमनी पाच टक्के खाटा वाढविण्याचे आणि अधिक रुग्णांवर उपचार करण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्लेटलेट्स कमी झाल्याचे रक्त तपासणीत दिसून आल्यानंतर रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरते. यामुळे

रुग्ण रुग्णालयात दाखल होण्याचाही आग्रह करतात. डेंग्यू या आजारावर नेमके उपचार नाहीत. चांगला आहार आणि आराम यातून घरबसल्या रुग्ण बरा होऊ शकतो. मात्र नागरिकांमध्ये डेंग्यूबाबत भीती निर्माण झाली आहे. म्हणून रक्ततपासणीत प्लेटलेट्स कमी झाल्यावर घाबरून रुग्ण थेट रुग्णालयात दाखल होतात, असे डॉ. बिपीन पंडित यांनी सांगितले.

रस्त्यावर साचलेली डबकी, सांडपाणी, उघडी गटारे यामुळेही आरोग्याला धोका निर्माण होतो. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जाते, असे डॉ. पंडित यांनी सांगितले. खासगी रुग्णालयात डेंग्यूच्या रुग्ण संख्येत दिवसाकाठी बदल होत आहेत. कधी एका दिवसात ३ ते ४ डेंग्यूचे रुग्ण दाखल होतात तर कधी ही संख्या ७ ते ८ वरही जाते. नोव्हेंबरमध्ये डेंग्यूच्या रुग्णात वाढ होण्याची शक्यता असून यानंतर कदाचित हे प्रमाण थोडे कमी होईल, असा अंदाज जसलोक रुग्णालयाचे डॉ. ओम श्रीवास्तव यांनी वर्तवला.

ऑक्टोबर महिन्यात पालिका रुग्णालयात तापाचे ५७९८ रुग्ण दाखल झाले होते. तर २३८ मलेरिया, १०२ डेंग्यू, १८१३ संशयित डेंग्यू, ९६ संशयित लेप्टो, १८ लेप्टो, २०० गेस्ट्रो, ३५ कावीळ आणि ४ चिकुनगुनियाचे रुग्ण दाखल झाले होते. प्रजा फाऊंडेशनच्या आकडेवारीनुसार २०११ ते २०१६ पर्यंत डेंग्यूच्या रुग्णात आठपटीने वाढ झाली असल्याचे पाहावयास मिळते. डिसेंबर २०१५ ते एप्रिल २०१६ पर्यंत १२४ डेंग्यूमुळे मृत्यू झाला असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.

प्रतिबंधात्मक उपाय

  • वातानुकूल यंत्र, फ्रिज वेळोवेळी स्वच्छ करा
  • घरातील बांबू, मनी प्लांटमधील पाणी बदलावे.
  • घराच्या छतावरील जुने टायर, थर्माकोल, जुने हेल्मेट काढून टाकाव्यात.
  • घराच्या खिडक्यांना मच्छरप्रतिबंधक जाळ्या लावून घ्याव्यात.

mosqutto-chart