शहरभर जागृती करणाऱ्या पालिकेचे ‘घरा’कडे दुर्लक्ष

महापालिकेच्या कीटकनाशक विभागाने केलेल्या तपासणीत केईएम रुग्णालयाच्या आवारातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहाच्या इमारतीखाली व रुग्णालयाच्या गच्चीवर डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत. पालिकेकडून डेंग्यूच्या ‘एडिस इजिप्ती’ या डासांच्या अळ्यांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठय़ा प्रमाणात जनजागृती केली जात आहे. मात्र नागरिकांना स्वच्छतेचे धडे देणाऱ्या महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयाच्या आवारातच डेंग्यूच्या अळ्या सापडल्यामुळे पालिकेच्या स्वच्छता मोहीमेची सुरुवात ‘घरा’पासून करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी साचून राहिल्याने त्यावर डेंग्यूच्या अळ्यांची पैदास होऊन आजार कसे पसरतात, या विषयी पालिका दरवर्षी जाणीवजागृती करत असते. त्यासाठी पालिकेने गरीबांपासून श्रीमंतांपर्यंतच्या घरांमध्ये जाऊन कारवाईही केली आहे. असे असताना मुंबईसह राज्यभरातील गरीब रुग्णांच्या उपचाराचे आशास्थान असलेल्या केईएम रुग्णालयात डेंग्युच्या अळय़ा सापडल्या आहेत. केईएम रुग्णालयाच्या आवारात अनेक ठिकाणी कचरा आणि टाकाऊ वस्तू पडलेल्या असतात. अनेक ठिकाणी जलवाहिनी फुटल्याने पाणीगळती होऊन ते साचून राहते, अशी रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची तक्रार आहे. त्यातच सोमवारी पालिकेच्या कीटकनाशक विभागाने केलेल्या तपासणीत केईएम रुग्णालयाच्या गच्चीवर एका भांडय़ामध्ये आणि रुग्णालयाच्या आवारातील महिला वसतिगृहाच्या इमारतीखाली अडगळीच्या जागेत डेंग्यूच्या अळ्या सापडल्या आहेत.

kem-hopsital-chart

डेंग्युचा इतिहास

गेल्या वर्षी केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहातील कूलरमध्ये डेंग्यूच्या अळ्या सापडल्या होत्या. यामुळे येथील चार निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली होती. तर २०१४ साली ऑक्टोबर महिन्यात भुलतज्ज्ञ विभागात तिसऱ्या वर्षांला शिकणाऱ्या २३ वर्षीय श्रुती खोब्रागडे या निवासी डॉक्टरचा डेंग्यूची लागण झाल्यामुळे मृत्यू ओढवला होता. श्रुती ही केईएम रुग्णालयाच्या आवारातील महिला वसतिगृहात राहत होती. डेंग्यूची लागण झाल्यानंतर तिच्यावर याच रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र प्लेटलेट्स झपाटय़ाने कमी झाल्यामुळे तिचा मृत्यू झाला.

या वसतिगृहाजवळ अनेक अनावश्यक वस्तू जमा करुन ठेवल्या आहेत. त्यातच डेंग्यूच्या अळ्यांची पैदास होऊन श्रुतीला आपला जीव गमवावा लागला, असे या रुग्णालयातील डॉक्टरांचे म्हणणे आहे. या घटनेनंतरही ३ निवासी डॉक्टरांना डेंग्यूची लागण झाली होती.

नोटिसा कुणाला?

डासांचा प्रादुर्भाव रोखण्यात अपयशी ठरल्याबद्दल पालिकेने ४७४६ जणांना नोटिसा बजावल्या आहेत. यात प्रामुख्याने पाण्याची टाकी डास प्रतिबंधक नसणे, विहीर डास प्रतिबंधक न करणे, कारंजे किंवा बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी डास प्रतिबंधाच्या दृष्टीने काळजी न घेणे इत्यादी कारणांसाठी देण्यात आल्याची माहिती पालिकेच्या कीटकनाशक विभागाचे प्रमुख राजन नारिंग्रेकर यांनी दिली.

रुग्णालय व्यवस्थापनाने तातडीने कारवाई करुन इमारतीजवळील कचरा व टाकाऊ वस्तू उचलून येथील जागा स्वच्छ करुन घेतली आहे. यासंदर्भात बुधवारी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची बैठकही घेण्यात आली होती. यापुढे रुग्णालयाच्या आवारात पाणी साचून राहू नये याची खबरदारी घेण्यात येईल.

डॉ. अविनाश सुपे, अधिष्ठाता, केईएम रुग्णालय