देवनार कचराभूमीला खेटून उभ्या असलेल्या झोपडय़ांविरुद्ध पालिकेने सुरू केलेली धडक कारवाई गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी सुरू होती. या कारवाईत अडथळा निर्माण करण्यासाठी गुरुवारी काही अज्ञात व्यक्तींनी कचराभूमीत आग लावली. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करीत वेळीच आगीवर नियंत्रण मिळविल्याने अनर्थ टळला. कचऱ्याने मोठय़ा प्रमाणावर पेट घेतला असता तर पुन्हा एकदा मुंबईकरांना धुराचा त्रास सहन करावा लागला असता. परंतु कचऱ्याच्या आगीत हात पोळल्यानंतरही पालिकेची इथली सुरक्षा व्यवस्था किती ढिसाळ राहिली आहे, याची प्रचीती या प्रसंगामुळे आली आहे.
देवनार कचराभूमीच्या आसपास आदर्शनगर, पद्मानगर, इंदिरानगर उभे राहिले असून कचराभूमीच्या सभोवताली उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीला अनेक ठिकाणी खिंडार पाडण्यात आले असून त्यातून कचराभूमीत अनधिकृतपणे कचरा टाकण्यात येत आहे. संरक्षक भिंतीला खेटून बाहेरच्या बाजूला झोपडपट्टी दादांनी मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत झोपडय़ा उभारल्या असून काही ठिकाणी कचरा वेचण्यासाठी मोठे गाळेही उभारले आहेत. कचराभूमीतील कचरा तेथे निवडून हव्या त्या गोष्टी काढून घेतल्या जातात आणि उरलेला कचरा कचराभूमीत फेकला जातो. याबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर पालिकेने बुधवारपासून या झोपडपट्टय़ा जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली. बुधवारी दिवसभरात तब्बल १५० झोपडय़ा आणि पाच मोठे गाळे तोडण्यात आले.
पालिका अधिकाऱ्यांनी गुरुवारी अनधिकृत झोपडय़ा जमीनदोस्त करण्यास सुरुवात करताच अचानक रफिकनगरच्या दिशेला कचराभूमीमध्ये धूर येत असल्याचे निदर्शनास आले. कचऱ्यातून आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागताच पालिका अधिकाऱ्यांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले.

अनर्थ टळला
ही आग कचऱ्यामध्ये खोलवर पसरत गेली असती तर अनर्थ घडला असता. देवनार, मानखुर्द, चेंबूर आणि आसपासचा परिसर धुरमय होऊन रहिवाशांना त्रास सहन करावा लागला असता. झोपडपट्टय़ांविरुद्ध सुरू असलेल्या कारवाईत अडथळा निर्माण करण्यासाठी अज्ञात व्यक्तींनी कचराभूमीत आग लावली असावी, असा संशय अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.