अकरावीसाठी निश्चित केलेले प्रवेश रद्द करण्यास शिक्षण उपसंचालकांची मनाई

अकरावीमध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना आता कोणत्याही परिस्थितीत प्रवेश रद्द करता येणार नाही, असे शिक्षण उपसंचालक कार्यालयातून मंगळवारी जाहीर करण्यात आले आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वानुसार राबविण्यात येणाऱ्या नव्या फेरीमध्ये सहभागी होऊन पसंतीचे महाविद्यालय मिळवण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी घेतलेले प्रवेश रद्द करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे अकरावी प्रवेशाचा गुंता निर्माण झाला असता. म्हणून ‘बेंटरमेंट’साठी प्रवेश रद्द करण्याची पळवाट शोधणाऱ्या या विद्यार्थ्यांना चाप लावण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये आत्तापर्यंत चार प्रवेश फेऱ्या आणि एक खास फेरी राबविण्यात आली आहे. यानंतरही प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ३०८३ विद्यार्थ्यांसाठी ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वानुसार सोमवारपासून नवीन फेरी राबविण्यास सुरुवात झाली आहे. या फेऱ्यांमध्ये ८० ते १००, ६० ते १०० आणि ३५ ते १०० असे गुणांनुसार विद्यार्थ्यांचे तीन गटांत विभाजन करण्यात आले आहे. यामध्ये रिक्त जागांनुसार विद्यार्थ्यांला हव्या असलेल्या महाविद्यालयामध्ये ऑनलाइन प्रवेश निश्चित करण्याची सुविधा देण्यात आली आहे. यामुळे दर वेळेच्या प्रवेशप्रकियेप्रमाणे पसंतीक्रमांमधून मिळेल त्या महाविद्यालयाची वाट पाहत बसण्यापेक्षा विद्यार्थ्यांना थेट प्रवेश घेणे या फेरीमध्ये सोपे झाले आहे. तेव्हा या फेरीमध्ये हवे ते महाविद्यालय निवडण्याची संधी मिळणार आहे, असा गैरसमज करून अनेक विद्यार्थ्यांनी घेतलेले प्रवेश रद्द करण्यास सोमवारी सुरुवात केली होती.

एकीकडे नामांकित महाविद्यालयांच्या जागा भरल्या झाल्या आहेत, तर दुसरीकडे प्रवेश प्रकिया अंतिम टप्प्यात आली आहे. असे असताना विद्यार्थी प्रवेश रद्द करून पुन्हा प्रवेश फेरीमध्ये येऊ लागले तर अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणे कठीण होण्याची शक्यता आहे. तसेच प्रवेशप्रक्रिया किचकट होईल. यासाठीच चार फेऱ्या, एक खास फेरी यामध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश रद्द करता येणार नाहीत, अशी सूचना शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वानुसार राबविण्यात येणाऱ्या फेरीमध्येही निश्चित केलेले प्रवेश यापुढे रद्द करता येणार नसल्याचेही सांगण्यात आले.

पहिल्या गटफेरीत २०० विद्यार्थ्यांचा सहभाग

दरम्यान, सोमवारी झालेल्या ८० ते १०० गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या फेरीमध्ये सुमारे २०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केल्याचे समजले आहे. यातील बहुतांश विद्यार्थ्यांनी आधीच्या फेऱ्यांमध्ये प्रवेश निश्चित केले होते. परंतु पसंतीचे महाविद्यालय मिळवण्यासाठी या विद्यार्थ्यांनी आधीचे प्रवेश रद्द करून या फेरीमध्ये सहभागी झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.