शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारविजेत्या विदिता वैद्य यांचे प्रतिपादन; ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’ला उदंड प्रतिसाद

‘राग आणि आक्रमकता या मूलभूत भावना प्रत्येक प्राणिमात्रात दिसून येतात. मात्र राग नियंत्रणात कसा ठेवावा किंवा त्या परिस्थितीतून बाहेर कसे पडावे याचा विचार विकसित मेंदूच करूशकतो. थोडक्यात रागाला आवर घालता येणे हे विकासाचे लक्षण आहे,’ अशा शब्दांत ‘भाभा अणुसंशोधन केंद्रा’च्या संशोधक डॉ. विदिता वैद्य यांनी कुटुंबापासून ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर कलह निर्माण करणाऱ्या प्रश्नांचा मानवाच्या ‘अविकसित मेंदू’शी असलेला सहज संबंध अधोरेखित केला. निमित्त होते, ‘केसरी’ प्रस्तुत ‘लोकसत्ता व्हिवा लाउंज’ या कार्यक्रमाचे.
मानवाच्या मेंदूचा कार्यकारणभाव उलगडताना डॉ. वैद्य यांनी केलेले हे भाष्य कुठल्याही राजकीय, सामाजिक किंवा जातीय मुद्दय़ावर पेटलेल्या संघर्षांच्या संबंधात नव्हते; परंतु सध्याच्या अस्वस्थ वातावरणाला, मानवाला मूलभूत भावनांवर नियंत्रण ठेवण्यात आलेले अपयशच कसे कारणीभूत ठरते हे या तरुणांसाठीच्या शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारावर नाव कोरणाऱ्या संशोधकाने अगदी नेमकेपणाने सांगितले. पिढय़ान्पिढय़ा मानवाच्या मेंदूची भौतिक रचना एक समानच राहिलेली असतानाही आजूबाजूच्या बदललेल्या वातावरणामुळे मेंदूच्या वापरात प्रचंड फरक पडल्याचे दिसून येते, अशा शब्दात त्यांनी सहजगत्या मेंदू आणि आजूबाजूचे वातावरण यांचा अनन्यसंबंधही विषद केला.
दादर (पश्चिम) येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. स्वत्वाची जाणीव निर्माण करणाऱ्या मेंदूबाबतच मानवाला अन्य अवयवांच्या तुलनेत अत्यल्प माहिती आहे. मात्र त्यामुळे त्याबद्दलचे कुतूहलही प्रचंड आहे हेच ‘लोकसत्ता’च्या सजग श्रोतृवर्गाच्या भरघोस प्रतिसादावरून दिसून आले.
संशोधक म्हणजे समाजापासून फटकून वागणारी, विचित्र सवयी असणारी वल्ली अशी प्रतिमा समाजात आहे. मात्र सद्यपरिस्थितीचे आणि राजकीय वास्तवतेचे भान असणाऱ्या सर्व तरुण संशोधकांच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. विदिता वैद्य यांनी मेंदूची शास्त्रीय परिभाषेतून मांडणी करतानाच सामाजिक वातावरणाची गरजही अधोरेखित केली. संशोधकांमध्ये स्त्रियांची संख्या अत्यल्प आहे. पण तशी ती प्रत्येक क्षेत्रातच आहे. समाजातील ज्या पन्नास टक्के वर्गाला जन्माला येण्यापासूनच थांबविले जाते, पुरेसे अन्न, पोषणापासून वंचित राहावे लागते, शाळा, पुस्तक ज्ञान यापासून दूर ठेवले जाते, आधी पालकांच्या आणि नंतर नवरा-सासरच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते तो घटक प्रत्येक क्षेत्रात कशी प्रगती करेल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थितांना विचारला.
उंदरासारख्या प्राण्यांमध्ये जन्मानंतरचे दोन आठवडे तर मानवामध्ये पहिली दहा वर्षे अत्यंत महत्त्वाची असतात. या काळात आलेल्या अनुभवांचा पगडा पुढे आयुष्यभर स्मरणात राहतो. त्यामुळे त्या वयात आपण मुलांना कोणते वातावरण देतो याचाही विचार करायला हवा, असेही वैद्य यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. शास्त्रज्ञ होण्यासाठी तुमचे कामावर प्रेम आणि संयम लागतो. काही क्षणांसाठी का होईना पण एखादी गोष्ट समजलेले आपण या पृथ्वीवरील पहिले आहोत ही भावना विश्वात आणखी अनेक कामांसाठी प्रेरणा देते असा सल्लाही त्यांनी युवतींना दिला. मेंदूसारखा गंभीर विषय असतानाही या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद लाभला. कार्यक्रम सुरू होण्याआधीच सभागृह भरून गेले होते. त्यामुळे, शेकडो प्रेक्षकांना बाहेर व्हरांडय़ात स्क्रीनसमोर बसून ही मुलाखत ऐकावी लागली.
(गप्पांचा सविस्तर वृत्तान्त पुढील शुक्रवारच्या ‘व्हिवा’ पुरवणीत)

शास्त्रज्ञ होण्यासाठी तुमचे कामावर प्रेम असावे लागते आणि संयमही असावा लागतो. काही क्षणांसाठी का होईना, पण एखादी गोष्ट समजलेले आपण या पृथ्वीवरील पहिले आहोत ही भावना विश्वात आणखी अनेक कामांसाठी प्रेरणा देते.
– डॉ. विदिता वैद्य

श्रोत्यांच्या प्रतिक्रिया
कठीण विषय सोप्या व सहज समजेल अशा भाषेत डॉ. वैद्य यांनी मांडला. त्यांच्याकडून चांगले मार्गदर्शन मिळाले. मेंदू विज्ञान शास्त्राबाबतची खूप माहिती समजली. कार्यक्रमाला वेळ कमी पडला असे वाटले. कार्यक्रमाचा दुसरा भाग लवकरच केला जावा.
’ विवेक नर
सामाजिक मेंदूची जडणघडण आणि बाह्य़ अनुभवांचा परिणाम याविषयीचे मोलाची माहिती गप्पांमधून समजली. मेंदूविज्ञान क्षेत्रात शिक्षण व करिअरच्या संधी किती आहेत, हे ही समजले.
’ उर्वी सावंत
कठीण विषय सोपा करून सांगितला. शास्त्रज्ञाला जवळून पाहण्याची, त्याच्याशी बोलण्याची आणि त्याचे विचार ऐकण्याची संधी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिळाली म्हणून मी मुद्दामहून आले होते. पुरूष आणि स्त्री मेंदूचे कार्य कसे चालते त्याची माहिती मिळाली.
’ सुरभी सुर्वे
तुडुंब गर्दी..!
मन श्रेष्ठ की मेंदू, मेंदूची रचना नेमकी कशी आहे, मेंदू आणि भावनांचे नाते काय, मेंदूच्या रनचेत बदल होतात का? या व अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवण्याकरता ‘लोकसत्ता’तर्फे गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हिवा लाउंज’ कार्यक्रमात शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारविजेत्या व मेंदू विज्ञान क्षेत्रात मोलाचे संशोधन करणाऱ्या डॉ. विदिता वैद्य यांनी थेट संवाद साधला. दादर येथील स्वातंत्र्यवीर स्मारक सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभला. सभागृह तुडुंब भरल्याने सभागृहाबाहेर ‘व्हिडीओ स्क्रीन’ लावण्यात आले होते. अनेकांनी सभागृहाबाहेरच ठाण मांडून विदिता वैद्य यांचे विचार ऐकले.