मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; ‘नमामि चंद्रभागामोहिमेसाठी प्राधिकरण

राज्यातील मोठय़ा प्रमाणात गर्दी असलेल्या देवस्थानांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे नियमित ऑडिट केले जाईल. तसेच पंढरपूर येथे ‘नमामि चंद्रभागा’ मोहिमेसाठी प्राधिकरण तयार करण्यात आले असून, त्याला लवकरच मंत्रिमंडळाची मान्यता घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले.

पंढरपूर येथील आषाढी एकादशी यात्रेत यंदा शासकीय यंत्रणेने अनेक अनियमितता केल्या असून, आमदारांनाही सकाळी पूजेच्या वेळी विठ्ठलदर्शनासाठी प्रवेश पत्रिका दिल्या नाहीत, अशी तक्रार लक्षवेधीच्या माध्यमातून आमदारांनी केली. आमदारांना पूजेच्या प्रवेशपत्रिका दिल्या नाहीत. परंतु, बाजारात मात्र जादा दराने या प्रवेश पत्रिका उपलब्ध होत्या, असा गंभीर आरोपही विरोधी पक्षाच्या आमदारांनी केला.

बाळासाहेब मुरकुटे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील आदींनी लक्षवेधीच्या माध्यमातून चंद्रभागेच्या परिसरातील अस्वच्छता व भाविकांसाठी अपुऱ्या सोयी-सुविधा असल्याची टीका केली. मात्र, आमदारांना प्रेवश पत्रिका देण्यात आल्या नसल्याच्या तक्रारी नाहीत. याबाबत चौकशी करण्याची आपली तयारी आहे, असे उत्तरादाखल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

न्यायालयाच्या आदेशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटात वारकऱ्यांना वास्तव्य करण्यास मनाई असून, या वारकऱ्यांची व्यवस्था नगरपरिषदेच्या मालकीच्या ६५ एकर जागेवर करण्यात आली होती. या ठिकाणी स्वच्छतागृहासह सर्व प्रकारच्या सोयीही उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यात्रेच्या कालावधीत पंढरपूरमध्ये २० हजार शौचालयांची व्यवस्था करण्यात आली होती.

तसेच नगरपरिषदेच्या माध्यमातून ११०० सफाई कामगारांनी स्वच्छतेचे काम केले. महापूजेसाठी १७१ अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना प्रवेशपत्र देण्यात आले असून प्रवेशपत्राचा कोणताही काळाबाजार झालेला नाही. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन ‘नमामि चंद्रभागा अभियान’ राबविले जाणार असून राज्यातील चंद्रभागा नदी २०२२ पर्यंत निर्मल व प्रदूषणमुक्त केली जाईल. तसेच भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन देवस्थानांमधील आपत्ती व्यवस्थापनाचे नियमित ऑडिट करण्याचेही मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.