भाजपश्रेष्ठींचा आदेश; प्रसिद्धीमाध्यमांमध्ये चमकणाऱ्या नेत्यांवर मुख्यमंत्र्यांचे लक्ष

प्रवक्तेपद नसलेल्या आणि प्रसिद्धीमाध्यमांशी बोलण्याची परवानगी नसलेल्या बोलघेवडय़ा नेत्यांना भाजपश्रेष्ठींनी चाप लावला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि केंद्रीय सहसरचिटणीस व राज्यातही प्रभारी सरचिटणीसपदाची जबाबदारी असलेल्या व्ही सतीश यांनी आता या नेत्यांवर नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक खासगी दूरचित्रवाणी वाहिनी आणि अन्य प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रतिक्रिया किंवा मते मांडलेल्या भाजप नेत्यांबाबत दर आठवडय़ाला सोमवारी पक्षश्रेष्ठींकडे अहवाल पाठविला जात आहे. प्रवक्तेपद नसताना खासगी वाहिन्यांवर बेधडक मते व्यक्त करणाऱ्या राज्याच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याला, तर अध्यक्ष अमित शहा यांनीच तंबी देण्याच्या सूचना दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

शिस्तबद्ध पक्ष असलेल्या भाजपमध्ये राज्यात बोलघेवडय़ा नेत्यांची कमतरता नसून पक्षाची कोणतीही परवानगी न घेता किंवा प्रवक्तेपद नसताना प्रसिद्धीमाध्यमांमध्ये झळकण्याचे प्रकार वाढले आहेत. तर काही प्रवक्ते पुरेसा अभ्यास नसताना त्या विषयावर बिनधास्तपणे खासगी वाहिन्यांवर मते व्यक्त करीत आहेत. ही बाब मुख्यमंत्री फडणवीस यांनी पाहिली आणि अध्यक्ष अमित शहा यांच्यापर्यंतही पोचली.  या प्रकारांची गंभीर दखल पक्षाने घेतली. अध्यक्ष शहा यांनीही गेल्या वेळच्या दौऱ्यात सूचना दिल्याने गेल्या तीन-चार आठवडय़ांमध्ये प्रसिद्धीमाध्यम विभागात शिस्त आणण्यात आली आहे. मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांच्या सूचनेनुसार राज्यातील प्रवक्त्यांनी भूमिका मांडावी, अशा सूचना देण्यात आल्या असून प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याकडे प्रसिद्धीमाध्यमे विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. सर्व खासगी वाहिन्यांना पत्रे पाठवून चर्चासाठी मुख्य प्रवक्ते किंवा भाजप कार्यालयाकडे निरोप पाठवावा आणि पक्षाकडून प्रवक्ते किंवा चर्चेसाठी नेत्यांना पाठविले जाईल, अशी लेखी पत्रेच नुकतीच रवाना करण्यात आली आहेत.

प्रत्येक खासगी वाहिन्यांवरील बातम्या, चर्चा आणि वृत्तपत्रांमध्येही कोणत्या नेत्यांनी पक्षाची भूमिका, मते व्यक्त केली आहेत, याचा अहवाल मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष दानवे व प्रभारी सरचिटणीस व्ही सतीश यांना पाठविला जात आहे. पक्षाची परवानगी न घेता मते मांडणाऱ्या नेत्यांना तंबी देण्यात येत आहे. प्रवक्त्यांची जबाबदारी व कार्यपद्धती काय आहे, याबाबत रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये नुकताच तीन दिवस अभ्यासवर्गही घेण्यात आला. त्या वेळी मुख्यमंत्र्यांनीही मार्गदर्शन केले होते.

प्रवक्त्यांनी केवळ पक्षाची भूमिका मांडावी

प्रवक्त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांमध्ये ‘वैयक्तिक मते’ न मांडता केवळ पक्ष सांगेल तेवढीच भूमिका मांडावी, त्यापेक्षा अधिक काहीही बोलू नये, अशा स्पष्ट सूचना त्यांना देण्यात आल्याची माहिती मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिली. भाजपचे राज्यात १५ प्रवक्ते असून त्यांच्यासह चर्चासाठी ३० नेत्यांची यादी करण्यात आली आहे. मुंबई भाजपचे १० प्रवक्ते असून अध्यक्ष आशीष शेलार यांच्याशीही प्रदेश भाजपचा समन्वय ठेवण्यात आला आहे.