राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये बायोमेट्रिक पद्धतीने उपस्थिती सक्तीची करताना त्याची जोडणी ही आधार व वेतनाशी संलग्न करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊनही वैद्यकीय शिक्षण मंत्रालयाकडून त्याच्या अंमलबजावणीत टाळाटाळ केली जात असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.

राज्यातील सोळा वैद्यकीय महाविद्यालयांतील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक तसेच अधिव्याख्याते बऱ्याच वेळा रुग्णालयातून गायब होऊन खासगी व्यवसाय करीत असल्याचे दिसून येते. याचा फटका मोठय़ा प्रमाणात जसा रुग्णांना बसतो तसाच तो वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही बसत असतो. राज्यात जे. जे. रुग्णालयाचे ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय, पुण्याचे बी. जे. मेडिकल, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, अंबेजोगाई, मिरज मेडिकल कॉलेज, धुळे, अकोला अशी सोळा वैद्यकीय महाविद्यालये व संलग्न रुग्णालये असून यांतील अनेक अध्यापक डॉक्टर हे सकाळी थोडा वेळ हजेरी लावून खासगी व्यवसायासाठी निघून जात असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. यातील अनेक डॉक्टरांना राजकीय वरदहस्त असल्यामुळे एक तर वर्षांनुवर्षे त्यांची बदलीही होत नाही आणि त्यांच्यावर कारवाई करण्याची हिंमतही कोणी दाखवत नाही. या साऱ्याचा रुग्णांना मोठा फटका बसत असल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयांत बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा बसविण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानुसार बहुतेक महाविद्यालयांत बायोमेट्रिक सिस्टीम बसविण्यात आल्या असल्या तरी या बायोमेट्रिक हजेरी पद्धतीला न जुमानण्याचे काम काही प्राध्यापक मंडळी करीत असल्याचे दिसून आले. याबाबत प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांना दूरध्वनी करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

याबाबत एका अधिष्ठात्यांनी सांगितले की, प्रत्येक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व अधिव्याख्याता यांनी बाह्य़रुग्ण विभागात किती रुग्ण स्वत: तपासले याचीही नोंद करणे सक्तीचे करून त्याचा साप्ताहिक आढवा अधिष्ठात्यांनी घेतल्यास किमान या मंडळींना रुग्णालयात उपस्थित राहावे लागेल.

शिकवणी सोडून खासगी प्रॅक्टिस

आज वैद्यकीय महाविद्यालयांतील अध्यापकांना उत्तम वेतन मिळत असून त्यांनी प्रामाणिकपणे रुग्णांना सेवा देणे तसेच विद्यार्थ्यांना शिकवणे अपेक्षित असताना बहुतेक महाविद्यालयांतील अध्यापक दुपारी बारानंतर खासगी प्रॅक्टिससाठी निघून जात असल्याचे दिसून येते. याची गंभीर दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधार व वेतनाशी संलग्न अशी बायोमेट्रिक हजेरी यंत्रणा वैद्यकीय महाविद्यालयांत बसविण्याचे आदेश दिले.

दोन महिने उलटूनही..

मुख्यमंत्र्यांनी आदेश देऊनही वैद्यकीय शिक्षण मंत्रालयातील उच्चपदस्थांनी त्याची गेल्या सहा महिन्यांमध्ये अंमलबजावणी केली नसल्याचे आढळून आल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांना पत्र पाठवून वेतनाशी संलग्न असलेली बायोमेट्रिक पद्धत तात्काळ लागू करण्याचे आदेश जारी केले. मुख्यमंत्र्यांनी आदेश जारी केले त्याला दोन महिने उलटूनही अद्यापि कोणत्याही वैद्यकीय महाविद्यालयात वेतन व आधार कार्डशी संलग्न असलेली बायोमेट्रिक हजेरी पद्धत बसविण्यात आलेली नाही.