सेवेत कायम करण्याचे मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन

तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी भेटायला बोलावलंय..हा निरोप मिळाला तेव्हा त्या डॉक्टरांचा स्वत:च्या कानावर विश्वास बसत नव्हता. आझाद मैदानावर बेमुदत उपोषणाला बसलेल्या डॉक्टरांनी थेट विधान भवन गाठलं. विधान भवनातील मुख्यमंत्र्यांच्या दालनात शिरल्यानंतर त्यांच्याशी नेमकं कसं बोलायचं, हा प्रश्न त्यांच्यापुढे होता. मुख्यमंत्र्यांच्या हातात आपलं निवेदन ठेवलं तेव्हा तुमचा प्रश्न मला माहीत आहे. तुम्हाला सेवेत कायम केले जाईल, हा माझा शब्द आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

नंदुरबार-गडचिरोलीसारख्या दुर्गम आदिवासी भागात गेली बारा वर्षे हंगामी डॉक्टर म्हणून तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या या बीएएमएस डॉक्टरांना कोणी वाली नव्हता. गेली चार वर्षे आपल्याला आरोग्य सेवेत कायम करावे यासाठी त्यांनी अनेक आमदार, मंत्री तसेच लोकप्रतिनिधींकडे खेटे घातले. राज्याच्या सोळा आदिवासी जिल्ह्य़ातील ४११ प्राथमिक आरोग्य केंद्रांवर काम करणाऱ्या या ७८१ अस्थायी आयुर्वेदिक डॉक्टरांबाबत आरोग्य विभागातील उच्चपदस्थांना आस्था होती पण हाती काही नव्हते. यापूर्वी २००९ मध्ये अस्थायी असलेल्या एमबीबीएस डॉक्टरांना सेवेत जसे कायम केले तसेच आपल्यालाही करावे एवढीच त्यांची मागणी होती. खरे तर दुर्गम भागात जायला एमबीबीएस डॉक्टर तयार नसतात. आरोग्य विभागात नोकरी मिळवताना कोठेही जाण्याची तयारी दाखवतात परंतु सेवेत आल्यानंतर एकतर बदली तरी करून घेतात किंवा नोकरी सोडून जातात. परिणामी दुर्गम आदिवासी भागात आरोग्यसेवेचा खरा कणा हा बीएएमएस डॉक्टर असतो. किमान रोज पन्नास रुग्णांवर उपचार करायचे, बाळंतपण, शवविच्छेदनापासून न्यायवैद्यकाच्या केसेसपर्यंत सर्व कामे हे डॉक्टर करत असतात. प्राथमिक आरोग्य केंद्रांच्याच ठिकाणी राहून दिवसरात्र रुग्ण सेवा करणाऱ्या या डॉक्टरांना गेली बारा वर्षे सेवेत कायम केले जात नव्हते.

विरोधी पक्षात असताना या डॉक्टरांसाठी आवाज उठवणारे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी गेल्या तीन वषार्ंत यांना सेवेत कायम न केल्यामुळे या डॉक्टरांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना साकडे घातले.युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनाही हे डॉक्टर भेटले. या डॉक्टरांना सेवेत कायम करण्याची भूमिका उद्धव ठाकरे यांनीही घेतली. तसे दीपक सावंत यांनीही आश्वासन दिले खरे परंतु गणित काही जमत नव्हते. अखेर अस्वस्थ झालेल्या डॉक्टरांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आत्महत्या करण्याची परवानगी मागितली.

त्यानंतर शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘मॅग्मो’ आयुर्वेद संघटनेचे डॉ. अरुण कोळी, डॉ. संकेत कुलकर्णी, डॉ. भरत व डॉ. स्वप्निल यांना विधान भवनात भेटले. डॉक्टरांनी आपले म्हणणे मांडण्यापूर्वीच तुमचे प्रश्न मला माहिती आहेत. तुम्हाला सेवेत कायम केले जाईल हा माझा शब्द आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच आरोग्य विभागाच्या भरारी पथकात काम करणाऱ्या १६२ आयुर्वेदिक डॉक्टरांनाही सेवेत कायम क रण्याबाबत निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले.  मुख्यमंत्र्यांनी अखेर ७८१ डॉक्टरांना न्याय दिला असे डॉ. अरुण कोळी यांनी सांगितले.