मुंबईच्या व अभियांत्रिकी क्षेत्राच्या नव्या युगाची सुरुवात- मुख्यमंत्री फडणवीस

गेल्या काही वर्षांपासून होणार-नाहीच्या चर्चेत अडकून पडलेल्या सुमारे २३ हजार कोटी रुपये खर्चाच्या कुलाबा-वांद्रे-सिप्झ या ३३ किलोमीटर लांबीच्या भुयारी मेट्रो प्रकल्पाच्या कामाला अखेर गुरुवारी सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माहीम येथील नयानगर येथे टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) भूगर्भात सोडून भुयार खोदण्याच्या कामाला सुरुवात झाली. त्या प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या सुटण्याबरोबरच उपनगरीय रेल्वेवरील ताण कमी होणार असून पर्यावरण संरक्षणालाही हातभार लागणार असल्याने या प्रकल्पाने मुंबईच्या व अभियांत्रिकी क्षेत्राच्या नव्या युगाची खऱ्या अर्थाने आज सुरुवात झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

मेट्रो-३चा संपूर्ण मार्ग भुयारी असून त्याची सुरुवात आज झाली. १७ टीबीएमच्या माध्यमातून या ३३ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे खोदकाम होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री विद्या ठाकूर, खासदार गोपाळ शेट्टी, आमदार आशीष शेलार, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त यू पी एस मदान, सहआयुक्त प्रवीण दराडे, मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे आदी उपस्थित होते.

मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाचे टीबीएम प्रत्यक्षात भूगर्भात उतरविताना पाहणे हा अनोखा अनुभव होता. या प्रकल्पाचे काम ज्या गतीने सुरू आहे ते पाहता हा प्रकल्प निर्धारित वेळत पूर्ण होईल. हा पर्यावरणपूरक असून दोन कोटी झाडांमुळे जेवढे पर्यावरण संवर्धन होते, तेवढे एकटय़ा मेट्रो प्रकल्पामुळे होणार आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, भुयार खोदण्याचे काम दोन वर्षे सुरू राहणार असले तरी टीबीएम मशीन भूगर्भात २५ मीटर खालून पुढे जाणार असल्याने त्याचा लोकांना कसलाही त्रास होणार नाही.

मुंबईतील जुन्या तसेच अडचणीतील भागातूनही हा मार्ग जात असला तरी त्याचा लोकांना त्रास होणार नाही, तसेच मुंबईत कितीही पूर आला तरी मेट्रो थांबणार नाही, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.

टनेल बोअरिंग मशीन हे जुळे बोगदे तयार करणार आहे. या यंत्रामध्ये फ्रंट शिल्ड, मिडल शिल्ड, कटर हेड व स्क्रूकनवेयर हे चार भाग आहेत. आजच्या कार्यक्रमात कटर हेड भूगर्भात सोडण्यात आले. यंत्राचे चारही भाग एकत्र केल्यानंतर ११० मीटर लांबीचे मशीन भुयारीकरणासाठी सज्ज होणार आहे. या मशीनच्या साहाय्याने नयानगर ते प्रस्तावित दादर मेट्रो स्थानकापर्यंत २.५ किमी लांबीचा बोगदा तयार होणार आहे.

मेट्रोबरोबरच उपनगरीय वाहतूक सक्षम करण्याचे काम सुरू असून उन्नत रेल्वेमार्गाचेही काम लवकरच सुरू होईल. त्याचबरोबर सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी प्रवाशांच्या सोईसाठी सिंगल तिकिटिंग प्रणाली उभारण्यात येणार आहे, त्यासाठी स्वतंत्र अ‍ॅप तयार करण्यासाठी फोर्ड कंपनीसोबत सामंजस्य करारही करण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. मेट्रो रेल कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत करताना मेट्रो ही काळाची गरज असून कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प वेळेत पूर्ण होईल असे सांगितले.

टनेल बोअरिंग मशीन हे जुळे बोगदे तयार करणार आहे. या यंत्रामध्ये फ्रंट शिल्ड, मिडल शिल्ड, कटर हेड व कन्वेयर हे चार भाग आहेत. आजच्या कार्यक्रमात कटर हेड भूगर्भात सोडण्यात आले. यंत्राचे चारही भाग एकत्र केल्यानंतर ११० मीटर लांबीचे मशीन भुयारीकरणासाठी सज्ज होणार आहे. या मशीनच्या साहाय्याने नयानगर ते प्रस्तावित दादर मेट्रो स्थानकापर्यंत २.५ किमी लांबीचा बोगदा तयार होणार आहे.