तस्करीविरोधी परिषदेत मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

महिलांची तस्करी म्हणजे त्यांच्या आत्मसन्मानाशी केलेला खेळ आहे. प्रत्यक्षात हत्येपेक्षा महिलांची तस्करी हा गंभीर गुन्हा आहे. त्याविरोधात सर्वानी एकत्र येऊन भरीव काम करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महिला तस्करीविरोधातील परिषदेत ते बोलत होते.

जुहूच्या जेडब्ल्यू मॅरियट या पंचतारांकित हॉटेलमध्ये दोन दिवसीय परिषदेला गुरुवारी सुरुवात झाली. राज्य महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टिस मिशनने ही परिषद आयोजित केली आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर, महिला-बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे, अभिनेता अक्षय कुमार, सेकंड लेडी ऑफ घाना हाजीया सामिरा बावुमिया, इंटरनॅशनल जस्टिस मिशनचे अध्यक्ष गॅरी होगेन आदी मान्यवर उपस्थित होते.

महिलांना वस्तू म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे, असे मत मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. देश वेगवेगळे असले तरी त्यातल्या महिलांचे प्रश्न मात्र सारखेच आहेत, असेही त्या म्हणाल्या.

आपण सर्वच समाजाचे पाहारेकरी आहोत, असे सांगत अभिनेता अक्षयने आपण पुढे होऊन मानवी तस्करी रोखण्यासाठी आपापल्यापरीने योगदान दिले पाहिजे. महिलांना, तरुणींना त्यांच्या हक्काची जाणीव करून दिली पाहिजे. त्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले पाहिजेत. तसे झाल्यास तस्करीविरोधातील लढय़ास मदत होईल, असे निरीक्षण नोंदवले.

दहा हजार मुलांची सुटका

तस्करीला बळी पडलेल्या महिलांची केवळ सुटका करून थांबता येणार नाही. तर त्यांच्यातील आत्मविश्वास पुन्हा जागवून स्वावलंबी करणे महत्त्वाचे आहे. राज्यात मुस्कान मोहिमेअंतर्गत तस्करीला बळी पडलेल्या, अपहरण घडलेल्या, बेपत्ता झालेल्या तब्बल दहा हजार अल्पवयीन मुलांना शोधून काढण्यात, सुटका करण्यात यश आले आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.