अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबतच्या भोजनसमारंभाचे आमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येऊनही ते पाठविण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. नवीन सरकार गतिमान झाले असताना प्रशासन मात्र सुधारत नसल्याचे हे उदाहरण असून भोजन समारंभाचे हे निमंत्रण ‘स्पीड पोस्ट’ ने मुंबईला पाठविल्याचे अजब उत्तर दिल्लीतील अधिकाऱ्याने दिल्याने मुख्यमंत्र्यांनी कपाळावर हात मारुन घेतला आहे.
ओबामा भारत भेटीवर असताना राष्ट्रपती भवनात भोजन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह तीन मुख्यमंत्र्यांना निमंत्रण पाठविण्यात आले होते. मुख्यमंत्र्यांचे निमंत्रण नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात १७ जानेवारीला देण्यात आले होते. माजी निवासी आयुक्तांनी ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचविण्याची जबाबदारी एका अधिकाऱ्यावर सोपविली होती. त्या अधिकाऱ्याने चक्क स्पीड पोस्टने ते मुंबईला पाठविले. मुख्यमंत्र्यांना हे आमंत्रण पाठविल्याची कल्पनाच देण्यात आली नव्हती. ती मिळाली असती, तर आपण दाव्होसहून थेट दिल्लीलाच पोचलो असतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
ओबामांबरोबरच्या आमंत्रणाबाबत जर एवढय़ा हलगर्जीपणाने कार्यवाही होत असेल, तर ते अतिशय गंभीर आहे. त्याची दखल घेण्यात आली असून निवासी आयुक्तांना चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यांच्या अहवालानंतर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.