दोघांच्या लोकप्रतिनिधींच्या कारकिर्दीस २२ फेब्रुवारीला सुरुवात झाली. अर्थात दोघेही निवडून येण्यातील अंतर हे तब्बल २५ वर्षांचे आहे. एक आमदार तर दुसरा नगरसेवक म्हणून निवडून आला. योगायोग किंवा अन्य काय, पण पुढे दोघेही मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचले व तेही  उभयतांना तरुण वयातच मिळाले .

२२ फेब्रुवारीला लोकप्रतिनिधीपदाची सुरुवात करणारे हे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. २२ फेब्रुवारी १९६७ या दिवशी पवार हे बारामती मतदारसंघातून काँग्रेसच्या वतीने विधानसभेवर निवडून गेले होते. २२ फेब्रुवारी १९९२ ला देवेंद्र फडणवीस हे नागपूर महानगरपलिकेत भाजपचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. विशेष म्हणजे पवारांचे वय तेव्हा २७ होते तर फडणवीस यांचे वय होते २२.

पवार यांना तरुणपदी मंत्रिपद मिळाले. फडणवीस हे १९९७ मध्ये तरुण वयातच नागपूरचे महापौर म्हणून निवडून आले. पवारांना ३८व्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्रीपद पहिल्यांदा मिळाले. फडणवीस यांना ४४व्या वर्षी मुख्यमंत्रीपदाची संधी मिळाली.

पवार यांनी चारदा मुख्यमंत्रीपद, केंद्रात संरक्षण, कृषी, अन्न व नागरी पुरवठा ही महत्त्वाची खाती भूषविली. लोकसभेचे विरोधी पक्षनेते, विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदही भूषविले.

काँग्रेस, समाजवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस असा त्यांचा राजकीय प्रवास आतापर्यंत झाला आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्र भाजप तसेच भाजयुमोचे प्रदेशाध्यक्षपद भूषविले आहे.