मुख्यमंत्र्यांचा निर्णय; लोकप्रतिनिधींचा आदर राखण्याची आयुक्तांना सूचना

नवी मुंबईचे वादग्रस्त ठरलेले महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाला असला तरी त्यांनाच महापालिका आयुक्तपदी कायम ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मुंढे हे कार्यक्षम अधिकारी असल्याचे नमूद करत त्यांची बदली करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली आहे. मुंढे यांना हटवण्यासाठी शिवसेना आग्रह होती. मुंढे यांना अभय देतानाच त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करावा, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

तुकाराम मुंढे यांना हटविण्याचा ठराव महापालिकेत करण्यात आला होता. मुंढे यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूरही करण्यात आला. तरीही त्यांनाच आयुक्तपदी कायम ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. भ्रष्टाचार व बेकायदा बाबींना वेसण घालण्याचा प्रयत्न मुंढे यांनी केला. त्यामुळे काही लोकांना त्याचा फटका बसला, ते अस्वस्थ झाले आणि त्यांनी मुंढे यांना हटविण्याचा घाट घातला. पण महापालिकेने मंजूर केलेल्या अविश्वास ठरावाची अंमलबजावणी करणार नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले. अविश्वास ठरावाला ज्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला, त्यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि आयुक्तांना पारदर्शी व कार्यक्षमतेने काम करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. नगरविकास विभागाने महापालिकेच्या सचिवांना पत्र पाठवून अविश्वास ठरावाचा तपशील मागविला आहे.

पण आयुक्त मुंढे हे लोकप्रतिनिधींशी योग्य पध्दतीने वागत नसल्याच्या तक्रारी होत्या. त्यांचा सन्मान ठेवण्याच्या सूचना फडणवीस यांनी मुंडे यांना दिल्या आहेत. लोकप्रतिनिधींच्या मागण्या जर बेकायदेशीर असतील, तर त्या मान्य करण्याची गरज नाही. पण लोकशाही व्यवस्थेत लोकप्रतिनिधींचा आदर राखला गेलाच पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.