मुख्यमंत्र्यांची घोषणा; ठाणे महापालिकेचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात

ठाणे शहाराची पाण्याची तहान भागविण्यासाठी कळवा खाडीतील खाऱ्या पाण्याचे गोडय़ा पाण्यात रूपांतर करणारे प्रकल्प उभारण्याचा ठाणे महापालिकेचा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या प्रकल्पातून ठाणेकरांना मिळणाऱ्या पाण्याचा दर प्रति हजार लिटर ९३ रुपये असल्याचे सांगत विरोधकांनी सोमवारी विधानसभेत या प्रकल्पाबाबत जोरदार आक्षेप घेतल्यानंतर संपूर्ण प्रकल्पाची छाननी करून त्यात काही गडबड आढळल्यास महापालिकेस उचित सूचना केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

ठाणे शहरातील पुढील काही वर्षांतील पाण्याची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी खाडीतील खाऱ्या पाण्याचे गोडय़ा पाण्यात रूपांतर करणारे प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार खारीगाव गणपती विसर्जन घाटावर २० दशलक्ष लिटर्सचा, तर घोडबंदर रोडवरील खाडीवर २०० दशलक्ष लिटर्स पाण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. ‘फाऊंटन-डिसालिया’ही स्पॅनिश कंपनी हा प्रकल्प उभारणार असून त्याला महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली आहे. मात्र या प्रकल्पात मोठा घोळ असून कोणाच्या तरी हितासाठी हा प्रकल्प राबविला जात आहे.

शहरातील पाण्याची समस्या लक्षात घेऊन घोडबंदर परिसरातील नव्या बांधकामांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र विकासकांच्या दबावामुळे शहरात पुरेसे पाणी असल्याची दिशाभूल करणारी माहिती महापालिकेने प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून उच्च न्यायालयास दिल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी केला.

या प्रकल्पातून महापालिकेस मिळणाऱ्या पाण्याचा दर प्रति हजार लिटर्स ९३ रुपये असा आहे. त्यासाठी विकासकास महापालिका सर्व सुविधा देणार असून लाइटचाही खर्च महापालिका करणार असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यावर या संपूर्ण प्रकल्पाची छाननी केली जाईल आणि आवश्यकता वाटल्यास महापालिकेस योग्य त्या सूचना दिल्या जातील असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

ठाणे बावळण रस्ता प्रकल्प मार्गी

ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यास परिणामकारक ठरणारा आणि गेल्या कित्येक वर्षांपासून चर्चेत असलेला ठाणे बावळण रस्त्याला लवकरच मान्यता देण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी सोमवारी दिले. जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित करताना मुलुंड चेक नाका- कोपरी- पटणी मैदान- मुकंद कंपनी ते खारेगावमधील आत्माराम पाटील चौक असा बावळण रस्ता लवकर मार्गी लावण्याची मागणी आव्हाड यांनी केली होती.