सरकार मोठे की प्रशासन यावरून मंत्री आणि सचिवांमध्ये गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या मानापमान नाटय़ाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी एकाच तडाख्यात मंत्री आणि सचिवांनाही चाप लावला आहे. अधिकारी आणि मंत्र्यांमध्ये सुरू असलेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर काही सचिवांच्या बदल्या करण्यात आल्या असून काही मंत्र्याच्या वाटय़ालाही कठोर प्रशासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सचिवांना नेमण्यात आले आहे.
मनासारखे सचिव न मिळाल्याने आधीच नाराज असलेल्या काही मंत्र्यांचे गेल्या काही महिन्यांपासून सचिवांशी खटके उडत आहेत. ‘आपण सरकार असून मंत्र्यांचे आदेश सचिवांनी पाळलेच पाहिजेत’, अशी भूमिका घेत मंत्री सचिवांवर दबाव आणत आहेत. तर ‘चुकीची कामे करणार नाही’, अशी भूमिका घेत सचिवांनीही मंत्र्यांशी पंगा घेतल्याचे प्रकार गेल्या काही दिवसांमध्ये घडले. मंत्रिमंडळच्या बैठकीतही सचिव आणि मंत्र्यांमधील वादाचे तीव्र पडसाद उमटले होते. शेवटी मंत्रीच श्रेष्ठ असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांना द्यावे लागले होते. मात्र त्यानंतरही हा वाद सुरूच राहिल्याने अखेर काही सचिवांच्या बदल्या करण्यात आल्या असून काही मंत्र्यांनाही सूचक इशारा मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे बोलले जाते.
वस्त्रोद्योग विभागाचे अप्पर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांची नियोजन विभागात अप्पर मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे. श्रीकांत सिंह यांची गृहनिर्माण विभागाच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती करून मुख्यमंत्र्यांनी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांना दिलासा दिला असला तरी त्यांच्याशी संघर्ष उडाल्याने चर्चेत आलेल्या सतीश गवई यांची जलसंपदा विभागात प्रधान सचिव म्हणून बदली करून गिरीश महाजन यांना सूचक इशारा दिल्याचे बोलले जाते. काही दिवसांपूर्वीच पर्यावरण विभागात दाखल झालेले सीताराम कुंटे यांना आपलेसे करीत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी या खात्यावर आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली होती. मात्र पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव म्हणून मालिनी शंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुंटे यांची वित्त विभागात प्रधान सचिव (व्यय) पदावर बदली करण्यात आली आहे. याशिवाय आर. जी. कुलकर्णी यांची नाशिक विभागाचे अप्पर आयुक्त, एम. पी. कल्याणकर यांची चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तर आशुतोष साळी यांची वर्धा जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.