राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट रायगडावर पोहोचले. शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन केले. शिवरायांच्या आशीर्वादाने आम्हाला राज्यात चांगले यश मिळाले आहे. त्यांच्या प्रेरणेतून आम्ही राज्यात काम करत राहू, अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी व्यक्त केली.

राज्यातील दहापैकी आठ महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये भाजपला चांगलेच यश मिळाले. पुणे आणि नाशिकमध्ये स्पष्ट बहुमत मिळवले. तर मुंबईत तब्बल ८२ जागा जिंकून दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. जिल्हा परिषदांमध्येही दणदणीत यश मिळवले आहे. महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये यश मिळवून ‘सामनावीर’ ठरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज थेट आपल्या पक्षाचे नेते आणि मंत्र्यांसोबत शिवछत्रपतींचे आशीर्वाद घेण्यासाठी रायगडावर पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, आमदार प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते.

महाड येथे हेलिपॅडवर आगमन झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रायगड किल्ल्यावर दाखल झाले. त्यानंतर रोप-वेने गडावर येऊन मुख्यमंत्र्यांनी प्रथम मेघडंबरी येथे शिवरायांचे दर्शन घेतले. होळीचा माळ येथील शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या समाधीस्थळी जाऊन दर्शन घेतले. शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाने आम्हाला राज्यात चांगले यश मिळाले आहे. त्यांच्या प्रेरणेतून राज्यात विकासकामे करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी पारदर्शकता आणि सुशासनाचा मंत्र दिला आहे. त्याच पथावरून आम्हीही जात आहोत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेने आमच्यावर, पक्षावर आणि आमच्या पारदर्शक कारभाराच्या अजेंड्यावर विश्वास दाखवला आहे. पारदर्शकतेचा हाच अजेंडा घेऊन आम्ही पुढे वाटचाल करू, असेही ते म्हणाले. शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र उभा करण्यासाठी अतुलनीय असे कार्य केले होते. त्यांच्या प्रेरणेतूनच आम्ही यापुढेही काम करत राहणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.