गणेशोत्सवानिमित्त सोडण्यात येणाऱ्या जादा रेल्वे गाडय़ांसाठी तात्काळ प्रणालीच्या धर्तीवर दर आकारणी करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. त्यामुळे सर्वसाधारण श्रेणीच्या तिकीटासाठी १० रुपये, तर शयनयान श्रेणीसाठी ९० रुपये जादा मोजावे लागणार आहेत. दरम्यान, या जादा आकारणीबाबत प्रवाशांकडून नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
गणेशोत्सवासाठी ११ ते २९ सप्टेंबर या काळात ६० जादा रेल्वे गाडय़ा सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या गाडय़ांची तिकिटे तात्काळ प्रणालीच्या धर्तीवर देण्यात येणार आहेत. पूर्वी कोकण मार्गावरील डबलडेकर एसी एक्स्प्रेससाठी प्रीमियम डायनॅमिक स्तरावर तिकीट आकारणी करण्यात आली होती. मात्र त्यामुळे तिकिटापोटी प्रवाशांना प्रचंड भरुदड पडला होता. त्यामुळे प्रवाशांनी टीकाही केली होती. ही बाब लक्षात घेऊन या वेळी मध्य रेल्वेने जादा गाडय़ांसाठी तात्काळ प्रणालीनुसार तिकीट दर आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.