धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या साठी आपण नेहमीच तत्पर आहोत. वेळोवेळी तशी जाहीर भूमिकाही मांडली आहे. केंद्रातील सरकारकडे या बाबत पाठपुरावा करणारे पत्रही पाठविले होते. मात्र, त्याला नकारात्मक उत्तर मिळाले. त्यामुळे या समाजाला आरक्षण देण्याच्या प्रश्नावर ज्यांनी राजकारण केले, ते आता बोटचेपी भूमिका घेत आहेत. परंतु या समाजाला न्याय मिळायला हवा, या साठी आपण एकदा मुख्यमंत्री व पंतप्रधानांकडे पाठपुरावा करणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केले.
ऊसदराबाबत पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा केली आहे. ऊस व साखरेच्या दरात टनामागे ६०० रुपयांचा फरक आहे. यापूर्वीही असे संकट आले होते. त्यावेळी आपण सर्व साखर केंद्र सरकारच्या गोदामात ठेवून प्रश्न सोडविण्याचा प्रभावी प्रयत्न केला. शेतकऱ्याच्या देयकातून ऊस विकास निधीच्या नावावर केंद्र सरकार दरवर्षी मोठय़ा प्रमाणात कपात करते. सध्या केंद्राकडे या ऊस विकास निधीचे सुमारे ४ हजार कोटी शिल्लक आहेत. हा निधी संकटाच्या वेळी शेतकऱ्यांसाठी वापरायचा असतो असे त्यांनी सांगितले.

राज्य सरकारने संमती दिल्यानंतर धनगर आरक्षणाबाबत केंद्र सरकार निर्णय घेणार आहे. सत्तेवर आल्यानंतर १५ दिवसांत धनगर समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन देणारे देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत. त्यांनी दिलेले शब्द पाळावेत. धनगर समाजाच्या नावावर ज्यांनी मते मागितली, ते आता आपली भूमिका बदलत आहेत. 
शरद पवार, अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस</p>

मराठा आरक्षणाबाबत सरकार सावध
मुंबई : धनगर आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने प्रस्तावच सादर केला नाही या केंद्रीय मंत्र्यांच्या पत्राचा हवाला घेत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपची कोंडी केल्याच्या पाश्र्वभूमीवर मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने सावध भूमिका घेतली असून, न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडण्याकरिता कायदेतज्ज्ञांकडून सल्ला घेण्यात येत आहे. मराठा आरक्षणाबाबत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी बैठक पार पडली. या वेळी मराठा आरक्षणाबाबत न्यायालयात सरकारच्या वतीने प्रभावीपणे भूमिका मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. कोणत्याही परिस्थितीत मराठा आरक्षण न्यायालयात टिकले पाहिजे, असा सरकारचा प्रयत्न आहे. न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडण्याकरिता दिल्लीतील निष्णात वकिलांचा सल्ला घेण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले. मुंबई उच्च न्यायालयात लवकरच प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येणार आहे.