‘म्हाडा’तर्फे ‘धारावी पुनर्विकास प्रकल्पा’च्या सेक्टर – ५ चा पुनर्विकास करण्यात येत आहे. या प्रकल्पातील क्लस्टर ‘जे’मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शताब्दी नगर या वसाहतीतील २६६ पात्र निवासी झोपडीधारकांपैकी २५५ झोपडीधारकांना मंगळवारी सकाळी एका समारंभात या पुनर्वसन सदनिकांचा प्रत्यक्ष ताबा देण्यात आला. या वेळी मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांच्या उपस्थितीत सदनिकांच्या चाव्यांचे व ताबा पत्राचे वाटप करण्यात आले.
‘म्हाडा’तर्फे धरावीत १८ मजली पथदर्शी इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीत ३०० चौरस फुटांच्या ३५८ सदनिका आहेत. या सदनिकांचे वाटप करण्यासाठी क्लस्टर ‘जे’मधील झोपडीधारकांची पात्र-अपात्र बाबतची प्रक्रिया राबवल्यानंतर २६६ निवासी झोपडीधारकांना पात्र करण्यात आल्याचे ‘म्हाडा’ने स्पष्ट केले. या झोपडीधारकांना इमारतीतील कुठल्या मजल्यावर व कोणती सदनिका द्यावी याबाबतचा निर्णय फेब्रुवारी २०१६ मध्ये सोडत काढून करण्यात आला.