दिवसेंदिवस मूत्रपिंड विकाराचे रुग्ण वाढत असून अशा रुग्णांसाठी मुंबईसह राज्यात डायलिसिसची पुरेशी सुविधा नाही. याउपरही डायलिसिससाठी येणारा खर्च हा रुग्णांच्या आवाक्याबाहेर असल्यामुळे रुग्ण व नातेवाईकांचे प्रचंड हाल होतात. या पाश्र्वभूमीवर गोरेगाव पूर्व येथे पालिका व स्वयंसेवी संस्थेच्या सहभागातून ३५० रुपयांमध्ये डायलिसिस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. येत्या शनिवारी २६ सप्टेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता या डायलिसिस केंद्राचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

गोरेगाव पूर्व येथील उमीया माता मंदिराशेजारी महापालिकेने तीन हजार चौरस फुटांची जागा पेप्स किडनी केअर सेंटरला उपलब्ध करून दिली असून या ठिकाणी डायलिसिसची एकूण पंधरा मशिन्स बसविण्यात आली आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प सुरू होत असून खार येथील लायन्स क्लब, सारस्वत बँक तसेच काही सामाजिक संस्थांनी मशिन्स व अन्य सामग्री उपलब्ध करून दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्यासमवेत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, खासदार गजानन कीर्तिकर व पालिका आयुक्त अजय मेहता या वेळी उपस्थित असतील.