अतिरिक्त सत्र न्यायाधीश देशपांडे यांनी सलमानला सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी ठरवून तुला या गुन्ह्यासाठी १० वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते त्याबाबत तुला काय म्हणायचे आहे, असा सवाल केला. त्यावर आपण गाडी चालवली नाही पण.. तुम्ही जो निर्णय द्याल तो आपल्याला मान्य असेल आणि आपले वकीलच आपली म्हणणे मांडतील, असे सलमानने उत्तर दिले. त्यानंतर सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी सलमानलाच वेगळा न्याय का, हा धागा पकडून त्याला शिक्षा वा कारागृहात पाठविण्याऐवजी त्याच्याकडून हवी ती नुकसान भरपाई वसूल करा वा त्याच्याकडून समाजसेवा करून घेण्याची न्यायालयाकडे विनंती केली.
सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली यापूर्वी एकालाही एवढी कठोर शिक्षा सुनावण्यात आलेली नाही वा वाहन अपघातासाठी १० वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावली जाण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असल्याचा दावा शिवदे यांनी केला. त्यांनी या वेळेस दिल्ली येथील संजीव नंदा प्रकरण, मुंबईतीलच अ‍ॅलिस्टर परेरा प्रकरण, पंजाबमधील दलबीरसिंह प्रकरण, भोपाळ वायू गळती प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालांचा दाखला दिला व सलमानलाच वेगळा न्याय का, असा सवाल केला. संजीव नंदा याने तर मद्यधुंद अवस्थेत तेही बॅरिकेड लावलेले आहेत हे माहीत असतानाही बेदरकारपणे गाडी चालवून सहाजणांचा जीव घेतला होता. त्याला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली तीन वर्षांची सर्वोच्च न्यायालयाने कमी केली. एवढेच नव्हे, तर याचप्रकरणी न्यायालयाने सर्वप्रथम आरोपीला कारागृहात पाठविण्याऐवजी त्याच्याकडून सामाजिक सेवा करून घेण्याची तरतूद केली होती. बऱ्याचशा देशात आरोपींकडून सामाजिक सेवा करून घेतली जाते. शिवाय भरघोस नुकसान भरपाईचा पर्यायही कायद्यात उपलब्ध आहे. शिवाय संजीव नंदा याने सहा जणांचा बळी घेतला होता, तर अ‍ॅलिस्टर परेराने सात जणांचा बळी घेऊन आठ जणांना गंभीर जखमी केले होते. दलबीर सिंहने चार जणांना गाडीखाली चिरडून ठार केले होते. तर भोपाळ वायू गळती प्रकरणामध्ये तर पाच हजार जणांचा बळी गेला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाची नव्याने सुनावणी घेण्यास नकार दिला होता. हे सगळे लक्षात घेता सलमानला १० वर्षांपर्यंतची शिक्षा सुनावली जाणे अत्यंत कठोर होऊ शकते. त्याला तर एकाच्या मृत्यूस आणि दोघांच्या दुखापतीस जबाबदार असल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले आहे. शिवाय संजीव नंदा, अ‍ॅलिस्टर परेरा यांच्या गाडीत मोठय़ा प्रमाणात मद्य आढळले होते. शिवाय त्यांच्या रक्तातही मद्याचे प्रमाण अधिक असल्याचे वैद्यकीय चाचणीत सिद्ध झाले होते. सलमानच्या रक्तात तर अगदीच किरकोळ मद्याचे प्रमाण आढळून आले होते. तसेच सलमान घटनास्थळावरून पळून गेला नव्हता.  असा युक्तिवादही शिवदे यांनी केला. अन्य प्रकरणांतील आरोपींच्या तुलनेत या सगळ्या जमेच्या बाजू सलमानच्या बाजूने असतानाही केवळ अभिनेता म्हणून त्याला वेगळा न्याय का, असा सवाल शिवदे यांनी उपस्थित केला. त्याला शिक्षा सुनावण्यात आले तर हे सगळे बंद होईल असा दावा करत सलमानला शिक्षा सुनावण्याऐवजी त्याच्याकडून हवी ती नुकसान भरपाईची रक्कम घेण्याची विनंती शिवदे यांनी न्यायालयाकडे केली.  

कठोर शिक्षाच हवी!
तर सलमान केवळ अभिनेता आहे म्हणून त्याला वेगळा न्याय देता येणार नाही, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला. सलमानला कठोर शिक्षा सुनावली गेली तर कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे हा संदेश समाजात जाईल. शिवाय मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालविण्याचे प्रकार कसे वाढत आहेत आणि रस्ते कसे मृत्यूचे सापळे बनत आहेत हे न्यायालयाला समजावून सांगताना त्याला आळा बसण्यासाठी तरी सलमानला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे, असा युक्तिवाद घरत यांनी केला.

बीइंग ह्य़ुमन या संस्थेमार्फत सलमान शिक्षण आणि आरोग्याच्या क्षेत्रात गरजूंना मदत करतो. गेल्या तीन वर्षांत संस्थेने गरजूंना ४२ कोटी रुपयांचे सहकार्य केले आहे. आतापर्यंत ६०० मुलांच्या हृदयाची शस्त्रक्रिया संस्थेमार्फत करण्यात आलेली आहे.