मुंबईतील नाले पावसाळ्यात तुंबण्याची भीती
पावसाळा जवळ आला तरी मुंबईमध्ये सेवा उपयोगिता कंपन्यांकडून रस्ते खोदण्याचे काम सुरूच असून त्यामुळे नाले आणि गटारांची कामे रखडली आहेत. नालेसफाई वेळेवर होऊ शकली नाही, तर पावसाळ्यात मुंबई जलमय होऊन नागरिकांना त्याचा फटका बसेल, अशी भीती नगरसेवकांनी मंगळवारी पालिकेत व्यक्त केली.
कुर्ला येथील एलबीएस मार्गावर टाटा पॉवर कंपनीला पालिकेने खोदकाम करण्याची परवानगी दिली होती. नियोजित वेळेत काम पूर्ण न झाल्यामुळे कंपनीच्या विनंतीनुसार साहाय्यक आयुक्तांनी १५ दिवसांची मुदतवाढ दिली. वाढीव मुदत २२ एप्रिलला संपुष्टात आली. मात्र आजही तेथे कंपनीचे काम सुरू आहे. पावसाळा जवळ येत असल्याने खोदलेले रस्ते तात्काळ बुजविण्याची गरज आहे. या खोदकामामुळे येथे नाल्याची आणि गटारांची सफाई होऊ शकलेली नाही. त्यामुळे तात्काळ काम बंद करून नाले, गटारांची सफाई सुरू करावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे नगरसेवक अश्रफ आजमी यांनी मंगळवारी पालिका सभागृहात केली. याप्रकरणी उपायुक्त, साहाय्यक आयुक्तांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी केली. उपनगरांमधील नालेसफाई होत नाही अशी कायम ओरड केली जाते. मात्र शहरातील घरगल्ल्या कचऱ्याने तुडुंब भरल्या असून त्यांची सफाई केली जात नाही. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी आणि दोषीविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका यामिनी जाधव यांनी केली. अनेक भागांतील आमदारांनी नाल्यांलगत शौचालये बांधून दिली आहेत. या शौचालयांतील मलयुक्त पाणी थेट नाल्यातच सोडले आहे. आमदारांना हा अधिकार कुणी दिला. मलयुक्त पाणी असलेले नाले कामगार कसे साफ करणार, असा सवालही यामिनी जाधव यांनी केला.