दिवाळी साजरी करण्यासाठी यंदा डिजिटल माध्यमांचा सर्वाधिक वापर झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत या डिजिटल वापरात दुप्पट वाढ झाल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. १८ ते ४४ या वयोगटांतील तरुणांच्या दिवाळी डिजिटल साजरीकरणाबद्दल करण्यात आलेल्या पाहणीत भेटवस्तू देणे, शुभेच्छा देणे किंवा खरेदी करणे यासाठी बहुतांश तरुणाई डिजिटल माध्यमाचाच वापर करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

आपल्या भावनांना वाट करून देण्यासाठी ९० टक्के तरुणाई ‘इमोजी’चा वापर करतात. यामध्ये ३९ टक्के लोकांनी ‘पाऊलां’चे इमोजी पाठविले आहे, तर ५६ टक्के  लोकांनी ‘जीफ’ फॉरमॅटमधील दिवाळी शुभेच्छा पाठविण्याला पसंती दिली आहे.  ८४ टक्के तरुणांना स्मार्टफोनमुळे सण साजरा करण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे वाटते. मायक्रोसॉफ्टच्या ‘स्विफ्टकी’ या उपकंपनीने दिवाळीनिमित्त ही विशेष पाहणी केली असून त्यात ही निरीक्षणे नोंदविण्यात आली आहे. आपल्या घरापासून लांब असलेले अनेक तरुण दिवाळीशी संबंधित अनेक अ‍ॅप्स डाऊनलोड करतात. यात लक्ष्मी पूजेसारख्या अ‍ॅप्सचा सर्वाधिक समावेश असतो. स्मार्टफोन वापरणाऱ्या ५९ टक्के तरुणांनी फटाक्यांमुळे होणाऱ्या ध्वनी आणि वायुप्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करत फटाके वाजविणे बंद केल्याचे सांगितले आहे. याला पर्याय म्हणून त्यांनी आभासी विश्वातील फटाक्यांना म्हणजेच फटाक्यांचे आवाज असलेले अ‍ॅप डाऊनलोड करण्याच्या प्रमाणातही वाढ झाल्याचे या सर्वेक्षणात समोर आले आहे. तसेच भारतीय भाषांमध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देणाऱ्यांच्या संख्येतही वाढ झाल्याचे यात समोर आले आहे.

इंग्रजी आणि हिंदीव्यतिरिक्त मुंबईत मराठी आणि गुजराती या दोन भाषांमध्ये सर्वाधिक संदेश पाठविले जातात. तर पश्चिम बंगालमध्ये बंगाली तर दिल्लीत पंजाबी भाषेत संदेश पाठविण्याचे प्रमाण जास्त आहे. बंगालमध्ये हिंदी आणि इंग्रजीला मागे सोडत बंगाली भाषेत सर्वाधिक ५४ टक्के संदेश पाठविले जातात.

नोकरीनिमित्त किंवा अन्य कामांनिमित्त बहुतांश तरुणाई आपल्या कुटुंबापासून लांब असते. अशा वेळी ते तंत्रज्ञानाच्या साह्य़ाने आपल्या कुटुंबाशी संवाद साधून दिवाळी साजरी करण्यावर भर देतात असे निरीक्षण स्विफ्टकी इंडियाच्या फारती समानी यांनी सांगितले. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी तरुणाई इमोजीचा सर्वाधिक वापर करते. तर तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सण साजरे करणे सुलभ झाल्याचेही तरुणाईला वाटत असल्याचे आरती यांनी नमूद केले.

काही महत्त्वाची निरीक्षणे

’स्मार्टफोनमधील भारतीय भाषांचा समावेश ही खूप स्वागतार्ह बाब असून त्यामुळे संवाद साधणे अधिक सोपे झाल्याचे ९० टक्के स्मार्टफोनधारकांना वाटते.

’सर्वेक्षणात सहभागींपैकी ७० टक्के तरुणांनी दिवाळीची खरेदी मोबाइल अ‍ॅपवरून किंवा मोबाइल संकेतस्थळावरून करण्यास पसंती दिली.

’८२ टक्के स्मार्टफोनधारक दिवाळीच्या कालावधीत मोबाइलवर दिवाळीची थिम ठेवतात.

’३० टक्के वापरकर्त्यांनी आपल्याला मिळालेले मोबाइल वॉलेटमधील पैसे अथवा इतर शॉपिंग संकेतस्थळावरील भेटवस्तू इतरांना भेट म्हणून देणे पसंत केले आहे.