आपल्या बहुविध आयामी चित्रशैलीतून मराठी मनावर अधिराज्य गाजविलेल्या चित्रकार दीनानाथ दलाल यांच्या चित्रांचे प्रदर्शन ‘नेहरू सेंटर’ येथे आयोजित करण्यात आले आहे. गेली तेवीस वर्षे नेहरू सेंटर कलादालनातर्फे दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या ‘भारतीय महान कलाकारांचे सिंहावलोकन’ या प्रदर्शनाचा बहुमान यावर्षी दीनानाथ दलाल यांना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांचे औचित्य साधून देण्यात आला आहे.

दीनानाथ दलाल यांनी विविध स्वरूपाची चित्रे काढली आहेत. अनेक नियतकालिके, पुस्तकांची मुखपृष्ठे, त्यांनी स्वत: सुरू केलेल्या ‘दीपावली’ या अंकातील चित्रे, भारतीय मिथकांवर आधारित चित्रांपासून ते सामाजिक, ऐतिहासिक विषयांवरील चित्रे तसेच राजकीय व्यंगचित्रे अशी विविध प्रकारांतील चित्रे त्यांनी रेखाटली आहेत. विशेषत: त्यांनी काढलेल्या मुखपृष्ठांनी मराठी साहित्यात सुमारे तीन दशके ‘दलालयुग’च निर्माण झाले होते. त्यांच्या चित्रांच्या या प्रदर्शनामुळे दलाल यांच्या अनेक गाजलेल्या आणि दुर्मीळ चित्रांचा आस्वाद रसिकांना घेता येणार आहे. ‘नेहरू सेंटर कलादालनात सुरू असलेल्या या प्रदर्शनात महात्मा गांधी, पंडित नेहरू, विनोबा भावे, ना. सी. फडके यांची दलालांनी काढलेली व्यक्तिचित्रेही पाहायला मिळतात. खण्डिता, विप्रलब्धा, कथाकली, यमुना, तेजस्विनी, सिंधू इत्यादी गाजलेली चित्रे तसेच विविध पुस्तकांची त्यांनी केलेली मुखपृष्ठेही प्रदर्शनात मांडलेली आहेत. याशिवाय शिवदरबार या अतिशय गाजलेल्या तैलरंगात रंगवलेल्या आणि सध्या शिवसेना भवन येथे असलेल्या मूळ चित्राची प्रतिकृतीही येथे पाहायला मिळणार आहे.

३ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी ज्येष्ठ लेखक रत्नाकर मतकरी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी मतकरी म्हणाले की, ‘दलालांची चित्रे लहानपणापासून पाहत आलो आहे. दीपावली अंकातली त्यांची चित्रे नंतरही माझ्यासोबतच राहिली. त्यांच्या चित्रांमध्ये जशी उत्फुल्ल व आनंदी माणसे आहेत तशीच त्यांनी उदास भाववृत्तीच्या स्त्रियांचीही चित्रे रेखाटली आहेत. विविध रंग, रचनांच्या अंतर्भावातून त्यांनी चित्रांमध्ये विविध विषय हाताळले. कदाचित त्यांच्या चित्रांमधल्या विविधतेमुळेच समीक्षकांना त्यांना विशिष्ट चौकटीत बसवता आले नाही.’ चित्रप्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभावेळी दीनानाथ आर्ट स्टुडियोने १९५५ साली काढलेल्या ‘शृंगारनायिका’ या पुस्तकाच्या दुसऱ्या व नव्या स्वरूपातल्या आवृत्तीचे प्रकाशनही करण्यात आले. दलाल यांची चित्रे असलेल्या या मराठी व इंग्रजी अशा द्विभाषिक पुस्तकाची दुसरी आवृत्ती रोहन प्रकाशनने काढली आहे. या वेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर हेही विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. दलाल यांच्या कन्या मीरा कर्णिक, प्रतिमा वैद्य, अरुणा कारे, अनिता राजाध्यक्ष व अन्य परिवार तसेच सुहास बहुळकर, विजया राजाध्यक्ष, रामदास भटकळ, प्रदीप चंपानेरकर, रमेश भाटकर यांच्यासह मराठी साहित्य व कला जगतातील अनेक मान्यवरही या वेळी उपस्थित होते.