भविष्यात भूकंप आणि नैसर्गिक आपत्ती आल्यास मोठी जीवितहानी टाळण्यासाठी नव्या इमारतींच्या बांधकामासाठी पर्यावरणाबरोबरच आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची परवानगीही सक्तीची करावी, अशी मागणी पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेकडूनच होऊ लागली आहे.
मुंबईत काही बांधकामांसाठी पालिकेकडून परवानगी घेण्यापूर्वी पर्यावरण विभागाच्या संबंधित समितीकडून पर्यावरणाची, तसेच पर्यावरण व वन मंत्रालयाकडून ‘ना हरकत’ परवानगी घ्यावी लागते. पर्यावरण आणि वने मंत्रालयाच्या पर्यावरणविषयक निकषांमध्ये आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची बांधकामांसाठी परवानगी घेण्यात यावी असे सूचित करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईतील बांधकामांसाठी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची परवानगी सक्तीची करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी केली आहे. मुंबईमधील बहुसंख्य इमारतींमध्ये आपत्कालीन व्यवस्थापनाच्या व्यवस्थेचा अभाव दिसून येतो. त्यामुळे भविष्यात भूकंप अथवा नैसर्गिक आपत्ती आल्यास मोठी जीवितहानी होऊ शकते. आपत्ती व्यवस्थापनाचा अभाव असल्यामुळे काळबादेवी दुर्घटनेत अग्निशमन दलातील तीन अधिकारी शहीद झाले. या पाश्र्वभूमीवर बांधकामांसाठी आपत्कालीन व्यवस्थापन विभागाची परवानगी सक्तीची करावी. तसेच बांधलेल्या इमारतीमध्ये आपत्कालीन व्यवस्थापनाची अंमलबजावणी करण्यात येते की नाही यावर काटेकोरपणे लक्ष ठेवावे, असे राहुल शेवाळे म्हणाले. या संदर्भात पालिका आयुक्त अजय मेहता यांना पत्र देण्यात आले आहे, असे ते म्हणाले.