भायखळा येथील डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या विस्तारीकरणासाठी लगतच्या मैदानाच्या जागेवर पार्किंग उभारण्याचा मुद्दा विरोधकांनी लावून धरलेला असतानाच, या जागेवर मैदानाचे आरक्षण नाहीच, असे सांगत पालिका प्रशासनाने आंदोलनातील हवा काढून घेण्याचा प्रयत्न केला. मंगळवारी झालेल्या पालिका सभागृहाच्या बैठकीत आयुक्तांकडून याबाबत लेखी निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनावर चर्चा करण्याची विरोधकांची मागणी फेटाळून लावत महापौरांनी कामकाज रेटून नेले.
जमनालाल बजाज फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे लाड संग्रहालयाचा विस्तार करण्याबाबत पालिकेने आराखडा तयार केला आहे. या आराखडय़ानुसार इमारतीला लागून असलेल्या मोकळ्या मैदानावर पार्किंगसाठी जागा देण्याबाबत स्थानिकांकडून विरोध होत आहे. दक्षिण मुंबईत आधीच मोकळ्या जागा कमी असल्याने संग्रहालयाच्या विस्तारीकरणाला विरोध सुरू झाला. याआधी डिसेंबर २०१२ मध्ये सुरक्षा चौकी व अडगळीचे साहित्य हलवून त्या जागी कॅफेटेरिया उभारण्यात आला होता, असे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले. त्यामुळे कॅफेटेरियाच्या जागेत पार्किंगची सोय करता येणार नाही. तसेच संग्रहालयालगत असलेली जागाही पालिकेच्या मालकीची असून त्यावर मैदानाचे आरक्षण नाही. प्रस्तावित वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीसाठीची जागा सद्यस्थितीतील कचरा टाकण्याच्या ठिकाणी आहे. उरलेल्या जागेच्या बांधकामाचा प्रस्ताव नाही, असे आयुक्त सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केले. नवीन वस्तुसंग्रहालयाच्या इमारतीसाठी २०१४-१५ या अर्थसंकल्पीय वर्षांत दहा कोटी रुपयांची तरतूद केली असल्याचेही त्यांनी नमूद केले. आयुक्तांच्या या निवेदनावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केली. मात्र चर्चेची वेळ निघून गेली आहे असे सांगत महापौर स्नेहल आंबेकर यांनी सभागृहाचे कामकाज पुढे सुरू ठेवले.