तेरा वर्ष घराची कचराभूमी करणाऱ्या मुलुंड पश्चिम येथील सावला कुटुंबाच्या घरात अजून दोन खोल्यांतील कचरा नेमका कुणी साफ करायचा यावरून पोलीस, पालिका आणि सोसायटीमध्ये वाद निर्माण झाला आहे. तर रुग्णालयातून परतलेल्या ८६ वर्षीय मणीबेन सावला यांना यापूर्वी सफाई करण्यात आलेल्या जागी पुन्हा कचऱ्यात ठेवण्यात आले आहे.
येथील झवेर मार्गावर असलेल्या गाईड या स्टेट बँक ऑफ इंडिया एम्प्लॉईज को. ऑप. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी इमारतीत राहणाऱ्या सावला कुटुंबातील मणीबेन या बरेच दिवसांपासून दिसत नसल्याचे सांगितले. घरातून दरुगधी येत असल्याचे जाणवल्याने पोलीस नियंत्रण कक्षाला कळविण्यात आले होते. या वेळी सदर जागी आल्यानंतर घराचा बनवलेला कचरा डेपो बघून पोलीसही अचंबित झाले. मात्र पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने महापालिकेची मदत घेऊन सर्वाच्या उपस्थितीत सदनिकेच्या बेडरूमचा ग्रील तोडला आणि सुमारे चार ट्रक आणि सहा टेम्पो एवढा कचरा बाहेर काढला. या कचऱ्यातून ८६ वर्षांच्या मणीबेन यांना बाहेर काढण्यात आले. उपचारासाठी त्यांना एम. टी. अग्रवाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गेली चार-पाच वष्रे सावला कुटुंबाचा कचऱ्याचा संग्रह करण्याच्या आगळ्यावेगळ्या वृत्तीचा दरुगधीमुळे सोसायटीतील रहिवाशांना त्रास होऊ लागला. त्यावरून सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी खटके उडू लागले. सावलांची साठी पार केलेली चारही भावंडांच्या विक्षिप्तपणाने त्यांचेही हा कचरा साफ करण्यात सहकार्य मिळत नसल्याने सोसायटीचे पदाधिकारी प्रथमपासून हैराण आहेत. सावला यांच्या घरातील कचरा पालिकेने साफ करून त्याच्या सफाईचा खर्च याच कुटुंबाकडून वसूल केला जावा, अशी लेखी भूमिका प्रथमपासूनच सोसायटीने घेतली आहे.
दिवसेंदिवस कचरा कुजत असल्याने दरुगधी वाढत आहे, पण उर्वरित कचरा कुणी उचलायचा, असा प्रश्न सोसायटीला पडला आहे. मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी सदनिकेतील कचरा उचलण्याबाबत पालिका टी-विभागाला पत्र पाठविल्याचे सांगितले. टी-विभाग साहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत सपकाळे यांच्या म्हणण्यानुसार हा प्रश्न सोसायटीचा आहे. सावला कुटुंब त्यांचे सदस्य आहे. पहिल्या वेळी मानवतेच्या दृष्टिकोनातून पंचनामा करून येथील कचरा हटवण्यात आला, परंतु आता हा पूर्णत: सोसायटीचा मामला आहे. त्याकरिता त्यांनी सोसायटीच्या खर्चाने सफाई कामगार लावले पाहिजेत आणि दरुगधीपासून मुक्तता मिळवावी, असे मत व्यक्त केले. सावला कुटुंबाचे सदस्य हरी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कचरा साफ झाला आहे, करणार आहे, अशी संदिग्ध उत्तरे देत बोलणे टाळले. तर या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या विरल शहा यांनी अजून दोन खोल्यांचा कचरा शिल्लक असल्याचे सांगून निर्माण झालेल्या गुंत्यातून मार्ग काढला जाईल, असे सांगितले.