पहिल्याच टप्प्यात राज्यातील जूनमधील सरासरी ओलांडून गायब झालेला पाऊस तीन आठवडे उलटूनही परतलेला नाही. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात (१ ते ७ जुलै) राज्यातील कोणत्याही जिल्ह्य़ात सरासरीच्या पाच टक्केही पावसाची नोंद झालेली नाही. जूनमध्ये सरासरीच्या दहा टक्के पाऊस अधिक झाला असला तरी जुलै महिन्यातील पहिल्या सात कोरडय़ा दिवसांनी ती सरासरीही मागे पडली आहे. मुंबई उपनगर व सातारा तसेच विदर्भातील काही जिल्हे वगळता राज्यात इतर सर्व जिल्ह्य़ांमध्ये पावसाचे प्रमाण सरासरीच्या खाली आले आहे. त्यातच जलाशयांमधील पाणीसाठा आटत चालल्याने राज्यावर जलसंकटाचे ढग जमा होऊ लागले आहेत. राज्याच्या अन्य भागांप्रमाणेच कोकण विभागातही पावसाने ताण दिल्यामुळे भातलावणीचे काम मोठय़ा प्रमाणात खोळंबले आहे. भाताचे कोठार मानल्या जाणाऱ्या रायगड जिल्हय़ात आतापर्यंत अवघ्या ८ ते १० टक्के क्षेत्रावर लावणी झाली असून, ७८ हजार हेक्टर क्षेत्र भातपिकाखाली असलेल्या रत्नागिरी जिल्हय़ात हे प्रमाण सुमारे ३० टक्के आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ातही सुमारे २० टक्के क्षेत्रावरच लावणीचे काम झाले आहे. दरम्यान, पुणे वेधशाळेच्या संचालक डॉ. सुनीता देवी यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे २० जुलैपर्यंत पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे नाहीत.