‘दिवाळी खरेच आली का?’, असा प्रश्न पडणारी स्थिती गेल्या काही दिवसांपासून अगदी मंगळवारी रात्रीपर्यंत राज्यातल्या सर्वच शहरगावांमध्ये होती. नेहमीच पंधरा दिवस आधीपासून खरेदीसाठी सहकुटुंब बाजारपेठेची गर्दी वाढविणारा मध्यमवर्ग, टिकल्यांपासून ते खरेदी केलेल्या लवंगीमाळांची दिवाळीपूर्व चाचणी करणारा उत्साही बच्चेकंपनीचा फटाकेफोडी उद्योग आणि खास दिवाळीकरीता राखून ठेवलेली इलेक्ट्रॉनिक्स, हौसे-चैनीच्या वस्तूंपासून ते सोन्याची खरेदी यंदा कमी प्रमाणात दिसत होती. दुकानांमध्ये ग्राहकांच्या गर्दीचे चित्र नेहमीपेक्षा यंदा कमी असल्यामुळे ही ‘नीरस धनतेरस’ असल्याची चर्चा व्यापारांपासून ग्राहकांमध्ये सुरू आहे.

दर कमी करूनही..

गुढीपाडवा, दसरा याप्रमाणेच धनत्रयोदशीला सोने खरेदी शुभ मानली जाते. यंदा तुलनेत सोने तसेच चांदीचे दर हे गेल्या वर्षीच्या स्तरानजीक आहेत. मंगळवारी मुंबईच्या सराफा बाजारात सोने तसेच चांदीचे दर कमी होऊनही दुकानांमध्ये ग्राहकांची  फारशी गर्दी दिसली नाही. निवडक खरेदीदारांनी यंदा भेटवस्तू देण्याच्या निमित्ताने दागिने वा वळे खरेदी करण्यापेक्षा नाणी तसेच मौल्यवान धातूच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल नोंदविला. ठाणे, मुंबई आणि पुण्याच्या बाजारपेठांमध्ये गेल्या आठवडय़ापर्यंत शुकशुकाट होती. दिवाळीला तीन दिवस उरलेले असताना काही प्रमाणात खरेदी झाली. मात्र सर्वच वस्तूंवर आकर्षक सवलती, भेट आदी देऊनही दरवर्षीपेक्षा निम्म्याहून ग्राहकगर्दी असल्याचे चित्र मंगळवापर्यंत होते. कपडे आणि चैनीच्या वस्तूंसाठी ऑनलाइन पर्याय वाढल्याने आणि लोकांचा ऑॅनलाइन खरेदी कल वाढल्यामुळे बाजारपेठेचे असे चित्र असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

समाजमाध्यमांमध्ये टीकोत्सव

एकीकडे  बाजारपेठ दिवाळसणामध्ये दरवर्षीपेक्षा निम्म्यावर आलेली असताना समाजमाध्यमांमध्ये बाजाराच्या नीरस अवस्थेबद्दल सरकारवर टीका करण्याचा उत्साह लोकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘अच्छे दिनां’चे विडंबन करणाऱ्या चारोळ्या आणि कोटय़ांचे संदेश वेगाने प्रसारित होत आहेत. दिवाळी अंकाच्या वाचनासोबत या शब्दफराळाचा लोक आस्वाद घेत आहेत.