व्यापाऱ्यांची भिस्त शनिवार-रविवारच्या खरेदीवर, अनेक व्यापाऱ्यांचा व्यवसायातून काढता पाय

दिवाळीत एकटय़ा मुंबईत साधारणपणे सव्वाशे कोटींची उलाढाल करणारा फटाक्यांचा बाजार तूर्त तरी थंड आहे. प्रदूषणाबाबतची जनजागृती, सर्वसामान्यांसह व्यापारी वर्गात असलेली उदासीनता, विक्रीवरून निर्माण झालेला राजकीय गोंधळ यामुळे यंदाही अपेक्षेपेक्षा फटाक्यांची विक्री कमी होईल, असा अंदाज उत्पादकांपासून बडे व्यावसायिक नोंदवत आहेत.

महंमद अली मार्गावरील बडे व्यापारी इसाभाई असो की मालाडमधील घाऊक फटक्यांची बाजारपेठ, दिवाळी तोंडावर आली तरी या व अशा प्रसिद्ध ठिकाणांवर तुलनेत शुकशुकाटच आहे. एरव्ही एक तारखेला पगार हाती पडल्यावर मुंबईकर सोयीने खरेदीसाठी बाहेर पडतात. दिवाळी आठवडय़ावर आली की अन्य वस्तूंप्रमाणे फटाक्यांची बाजारपेठही ग्राहकांनी फुलून जाते, पण यंदा तसे चित्र दिसत नाही.

‘‘मुंबई फटाक्यांची सर्वात मोठी बाजारपेठ समजली जाते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये विविध कारणांमुळे मुंबईत फटाकेविक्रीचे प्रमाण सातत्याने कमी होताना दिसते आहे,’’ असे मुंबई-ठाणे ‘डिस्ट्रिक्ट फायर वर्क्‍स डीलर्स वेल्फेअर असोसिएशन’चे अध्यक्ष नवीन चावडा यांनी सांगितले. चावडा म्हणाले, ‘‘दररोज संध्याकाळच्या वेळेस पाऊस पडतो. त्यामुळे ग्राहकवर्ग खरेदीला बाहेर पडलेला नाही. बाजारात शुकशुकाट आहे. आता दिवाळी आधीच्या शनिवार-रविवारवर आमची भिस्त आहे. त्यातच दिल्लीप्रमाणे मुंबईतही फटाके विक्रीवर बंदी आणण्याबाबत राजकीय पक्षांनी गोंधळ निर्माण केला. रहिवासी भागात फटाके विक्रीवर बंदी घालणारे उच्च न्यायालयाचे आदेश आले. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला. वेळेत परवाने न मिळाल्याने किंवा नूतनीकरण न झाल्याने अनेक विक्रेत्यांनी व्यवसायातून अंग काढून घेतले. या पाश्र्वभूमीवर मोठय़ा व्यापाऱ्यांनी नुकसान होण्यापेक्षा तुलनेत कमी माल उत्पादकांकडून मागवला. सध्या बाजारात तुलनेने खूपच कमी फटाके उपलब्ध आहेत.’’

१५ ते २० टक्क्यांची घट

तामिळनाडूतील शिवकाशी शहर फटाके उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. येथील ‘स्टँडर्ड फायर वर्क्‍स कंपनी’चे मालक माहेश्वरन यांच्या दाव्यानुसार एकटय़ा मुंबईत साधारणपणे सव्वाशे कोटींचे फटाके विकले जातात; पण त्याच वेळी गेल्या काही वर्षांमध्ये फटाक्यांची विक्री १५ ते २० टक्क्यांनी घटते आहे. ‘‘दिवाळीत मुंबई ही आमची मोठी बाजारपेठ असते. सण सहा दिवसांवर आला तरी अनेक विक्रेत्यांना परवाने मिळालेले नाहीत. प्रत्यक्षात फटाक्यांमुळे प्रदूषण वाढते, हा समज चुकीचा आहे. मुंबईत दिवाळीत फटाके वाजतात. हा संस्कृतीचा भाग आहे. यातून निर्माण होणारे प्रदूषण वाहनांच्या तुलनेत खूपच कमी आहे. शिवाय फटाके व्यवस्थित हाताळले तर अपघात घडत नाहीत,’’ असे माहेश्वरन यांनी सांगितले.

जनजागृतीचाही परिणाम

गेल्या काही वर्षांमध्ये फटाक्यांमुळे वायुप्रदूषण व ध्वनिप्रदूषण होत असल्याबाबत जनजागृती सुरू झाली. आज समाजमाध्यमांवरून प्रभावीपणे ही जागृती करण्यात येते. त्यामुळे सुतळी बॉम्ब, ताजमहाल, लवंगी, साप गोळी, लक्ष्मी बार या जास्त धूर व आवाज करणाऱ्या फटाक्यांच्या विक्रीत घट दिसू लागली आहे. पूर्वी सर्वसामान्यांपेक्षा व्यापारीवर्ग फटाक्यांचा मोठा ग्राहक होता. लक्ष्मीपूजनाला तो स्वत: लाखो रुपयांचे फटाके वाजवत होता आणि आपल्या कामगारांनाही भेट म्हणून देत होता. अलीकडे हा वर्ग फटाक्यांच्या बाजारात फिरकेनासा झालाय. पूर्वी दिवाळी म्हणजे फटाके हे अजोड समीकरण होते. ही मानसिकता आता बदलली आहे. आता मोबाइल, लॅपटॉप किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तू विकत घेण्याकडे कल जास्त दिसतो. म्हणजे फटाक्यांशिवाय दिवाळी साजरी होऊ  लागली, असे निरीक्षण चावडा नोंदवतात.

जीएसटीचा फटका नाही

जीएसटीचा परिणाम फटाका व्यवसायावर नाही होणार. उलट जीएसटीमुळे फटाके स्वस्त व्हायला हवे, अशी प्रतिक्रिया व्यापारी देतात. पूर्वी काही प्रकारच्या फटाक्यांवर तीस टक्के सीमाशुल्क आणि साडेबारा टक्के व्हॅट होता. आता २८ टक्के जीएसटीमुळे विक्रेत्यांच्या हाती स्वस्तात फटाके पडणार आहेत.