मुंबईतील अनेक भागांत हवेची गुणवत्ता खालावली

फटाके व प्रदूषणविरोधी जनजागृती मोहीम सातत्याने सुरू असूनही बुधवारी मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावली होती. ‘वायू व हवामान गुणवत्ता तपासणी व संशोधन संस्था’(सफर) च्या तपासणी आकडय़ांनुसार बुधवारी मुंबईतील सर्वसाधारण हवेची गुणवत्ता समाधानकारक असली तरी सकाळच्या कालावधीत अनेक विभागात हवेची गुणवत्ता ‘वाईट’ या प्रमाणात मोजली गेली. याशिवाय गुणवत्तेचे हे आकडे वेळेनुरूप बदलल्याचे चित्र दिसले. अभ्यंगस्नानाच्या पहाटे फोडण्यात आलेल्या फटाक्यांमुळे मुंबईतील अनेक विभाग सकाळी फटाक्यांच्या धुराने झाकले गेले होते.

पृथ्वी व विज्ञान मंत्रालयाची ‘सफर’ ही प्रदूषणमापक यंत्रणा मुंबईसह पुणे, अहमदाबाद आणि दिल्ली या मुख्य शहारातील हवेच्या गुणवत्तेबाबत तपासणी करते. गुणवत्तेच्या आकडय़ाच्या सुलभ मांडणीकरता प्रदूषित घटकांचे प्रमाण १०० या प्रमाणित एककात (एअर क्वॉलिटी इंडेक्स) रूपांतरित करून यंत्रणेच्या संकेतस्थळावर आणि मोबाइल अ‍ॅपवर प्रसिद्ध केले जातात. या आकडय़ानुसार हवेच्या गुणवत्तेची माडंणी सर्वसामान्यांना सोयीस्कर ठरावी याकरिता १०० पर्यंत ‘चांगली’, १०० ते २०० ‘समाधानकारक’, २०० ते ३०० ‘वाईट’, ३०० ते ४०० ‘अत्यंत वाईट’, ४०० ते ५०० पर्यंत ‘धोकादायक ’ या स्वरूपात करण्यात येते. बुधवारी मुंबईतील काही भागातील हवेची गुणवत्ता पाहिली असता हवेचा इंडेक्स २०० ते ३०० इतका नोंदवण्यात आला.

अभ्यंगस्नान आवरून पहाटेच  मोठय़ा प्रमाणात फोडल्या गेलेल्या फटक्यांमुळे हवेचे प्रदूषण होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे हवेची गुणवत्ता खालावल्याने स्थिती अधिक गंभीर बनली होती. मात्र दुपारी फटाके फोडण्याचे प्रमाण कमी झाल्याने स्थिती सुधारत असतानाच सायंकाळी पुन्हा दिवाळीच्या उत्साहाला सुरुवात झाली. त्यामुळे दुपापर्यंत सुधारलेली हवेची गुणवत्ता संध्याकाळी पुन्हा खालावल्याचे, ‘सफर’चे आकडे दर्शवीत होते. बुधवारी मुंबईतील एकूण एअर क्वॉलिटी इंडेक्स १४२ म्हणजे ‘समाधानकारक’ होती. बुधवारी सकाळी १० वाजता हवेची गुणवत्ता २३३ म्हणजे ‘वाईट’ होती. माझगाव विभागात मध्यरात्री १२०, सकाळी २१४ म्हणजे वाईट आणि दुपारी ३ वाजता २०४ प्रमाणित एककात गुणवत्ता नोंदवली गेली.