बहुचर्चित शीना बोरा हत्या प्रकरणाचा गुंता शुक्रवार संध्याकाळपर्यंत सुटला नव्हता. शुक्रवारी खार पोलिसांनी पेणच्या जंगलातून शीनाच्या मृतदेहाची कवटी आणि दोन हाडे जप्त केली. आता न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवून शीनाच्या मृतदेहाची ओळख पटवली जाणार आहे. दरम्यान, शीना ही इंद्राणीचा पहिला पती सिद्धार्थ दास याची मुलगी असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
खार पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी पेण येथे जाऊन शीनाच्या सांगाडय़ाचे काही अवशेष ताब्यात घेतले. त्यात कवटी आणि दोन हाडांचा समावेश आहे. ते डीएनए तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. त्यावरून हा मृतदेह शीनाचाच असल्याचे स्पष्ट होऊ शकणार आहे. तीन वर्षांपूर्वी जेव्हा शीनाचा मृतदेह जंगलात फेकण्यात आला होता तेव्हा पेण पोलिसांनी सांगाडय़ाचे अवशेष जे जे रुग्णालयाच्या अस्थी विभागाकडे पाठवले होते. आम्हाला २०१२ साली पेण पोलिसांकडून अशा प्रकारचे अवशेष मिळाले असल्याचे जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले.
दरम्यान, शीना बोरा हत्या प्रकरणात कोलकात्याहून अटक करण्यात आलेल्या संजीव खन्नाला शुक्रवारी वांद्रे न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्याकडून पारपत्र आणि व्हिसा जप्त करण्यात आला. हत्येसाठी कुणाची गाडी पुरवली आणि हत्या करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने त्याला ३१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली.
आयुक्तांकडूनच चौकशी
पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी शुक्रवारी इंद्राणी, श्याम राय, संजीव खन्ना यांना समोरासमोर बसवून चौकशी केली. तर पीटर मुखर्जी, शीनाचा भाऊ  मिखाईल याचीही चौकशी केली. रात्री उशिरापर्यंत ही चौकशी सुरू होती.
शीनाचा पिता सिद्धार्थ
इंद्राणीने शीनाच्या जन्मदाखल्यावर आईवडील म्हणून आपले वडील वी. के. बोरा आणि आपल्या आईचे नाव लावले होते. त्यामुळे शीना नेमकी मुलगी कुणाची असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु शुक्रवारी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने शीना ही इंद्राणीचा पहिला पती सिद्धार्थ दास याचीच मुलगी असल्याचे सांगितले. वेळ पडल्यास त्याला मुंबईत आणून जबाब नोंदविला जाईल असेही सांगितले.